थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ८ कोटी रुपये किमतीचा साडेतीन टन प्रतिबंधित हुक्का मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोरेगावमधून जप्त केला. यात, ८० पेक्षा जास्त प्रतिबंधित हुक्क्याचे फ्लेवर्स आहेेेत.
गोरेगाव पूर्वेकडील भागात जयकिशन अग्रवाल याने हुक्क्याचा साठा करून ठेवला होता. मुंबईत नाइट कर्फ्यू असतानाही काही मंडळी छुप्या पद्धतीने थर्टी फर्स्ट पार्टीच्या प्रयत्नात असल्याच्या शक्यतेतून मुंबईत ठिकठिकाणी झाडाझडती सुरू आहे. स्थानिक खबरी, सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच अमली पदार्थ विरोधी पथकही ड्रग्ज तस्कारांवर लक्ष ठेवून आहे.
२३ डिसेंबर २०२० रोजी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे प्रमुख सचिन वाझे यांना याबाबत माहिती मिळताच, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक व समाजसेवा शाखेने गोरेगाव पूर्वेकडील जनरल ए. के. वैद्य मार्ग येथील मुकादम कम्पाउंड येथे छापा मारून ही कारवाई केली. सव्वा लाख नागरिक सेवन करतील इतके या हुक्क्याचे प्रमाण आहे. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.