दीड वर्षात तीनदा बांधकाम
By Admin | Published: July 13, 2016 03:32 AM2016-07-13T03:32:57+5:302016-07-13T03:32:57+5:30
पालिका कंत्राटदाराच्या निकृष्ट कामामुळे चेंबूरच्या खारदेव नगरात गेल्या दीड वर्षात गटारावरील कलवट तीन वेळा बांधण्याची नामुश्की पालिकेवर आली आहे
मुंबई : पालिका कंत्राटदाराच्या निकृष्ट कामामुळे चेंबूरच्या खारदेव नगरात गेल्या दीड वर्षात गटारावरील कलवट तीन वेळा बांधण्याची नामुश्की पालिकेवर आली आहे. सध्याही हे कलवट पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत असल्याने वाहनचालकांसह रहिवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने अशा कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
चेंबूरमधील खारदेव नगर हा मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी परिसर असून, या ठिकाणी नेहमीच रहिवाशांची मोठी रहदारी असते. अशातच येथील कै. सुरेश पेडणेकर मार्गावरील एका गटाराचे कलवट गेल्या काही दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे. जोराचा पाऊस झाल्यास या ठिकाणी पाणीदेखील भरते. अशावेळी हे कलवट न दिसल्याने गेल्या काही दिवसांत या ठिकाणी अनेक वाहने अडकली आहेत. तर पाय अडकून काही रहिवासीदेखील जखमी झाले आहेत.
खारदेव नगर परिसरात अनेक शाळा आहेत. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ या तिन्हीही वेळेस वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्यातच हे कलवट ढासळल्यामुळे वाहनचालक, विद्यार्थ्यांसह स्थानिक रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांत तब्बल तीनवेळा हे कलवट नव्याने बांधण्यात आले होते. मात्र बांधून झाल्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत ते पुन्हा कोसळत असल्याने ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते राजेंद्र्र नगराळे यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पालिकेचा एकच ठेकेदार काम करीत असून, पालिका अधिकारीदेखील त्यालाच या परिसरातील कामे देत आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांत त्याने केलेली बहुतेक कामे ही निकृष्ट केली असून, सामान्य जनतेच्या पैशाची ही लूट सुरू असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अशा ठेकेदारासह पालिका अधिकाऱ्यांवरदेखील कडक कारवाईची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)