Join us

ड्रग्ज तस्करीत गुंतलेल्या मानसोपचार तज्ज्ञासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:08 AM

रोकडसह कोकेन, चरस जप्त : एनसीबीची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केकमध्ये मादक पदार्थ भेसळ करून तस्करी करणाऱ्या ...

रोकडसह कोकेन, चरस जप्त : एनसीबीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केकमध्ये मादक पदार्थ भेसळ करून तस्करी करणाऱ्या एका मानपसोचार तज्ज्ञासह तिघांना अंमलीपदार्थ नियंत्रक कक्षाने (एनसीबी) अटक केली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांतून कोकेन, चरससह एक लाख ७२ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

राहेमान चरनिया, रमजान शेख व च्युकवू इमेन ओग्बमो अशी त्यांची नावे आहेत. चरनिया हा मानसोपचार तज्ज्ञ असून, दक्षिण मुंबईतील एका नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. केकमध्ये अंमलीपदार्थांची भेसळ करून उचभ्रू वर्तुळातील पार्ट्यांमध्ये तो वितरित करीत होता, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

महानगरातील मादक पदार्थांची विक्री व तस्करी विरोधात एनसीबीने मोहीम उघडली आहे, माझगाव परिसरात एका ठिकाणाहून अफू व चरसचा समावेश असलेल्या केकची ‘हॅश ब्रोवणी’ विक्री केली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर पथकाने सोमवारी सापळा रचून चरनियाला पकडले. त्याच्याकडून दहा किलोचा हॅश ब्रोवणी नावाने विकला जाणारा केक जप्त केला. त्यामध्ये चरस, अफू मिक्स करून तो बनविण्यात आला होता. घराच्या झडतीमध्ये ३२० ग्रॅम अफू व चरस तसेच एक लाख ७२ हजारांची रोकड मिळाली. चरनिया हा रमझान शेख व इतरांकडून ते मिळवीत असे. हाय प्रोफाइल पार्टीमध्ये तो या केकचा पुरवठा करीत असे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या काही रुग्णांना मागणीनुसार तो पुरवठा करत होता, त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दुसरी कारवाई नालासोपारा येथे करण्यात आली. नायजेरियन नागरिक च्युकवू इमेन ओग्बमो याला अटक करून झडती घेतली असता त्याच्याकडे कोकेनची काही मात्रा मिळून आली. नायजेरियातून तो काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून भारतात आयात करीत होता. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.