मीरारोड - घरफोडी-चोरी करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे उत्तनच्या एका गुन्ह्यात अटक दोन अल्पवयीन मुलांवरून स्पष्ट झाले आहे. उत्तनच्या करईपाडा येथील मोबाईल दुकानचे पत्रे तोडून आतील ४१ हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल चोरीला गेले होते. उत्तन सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी आढळून आल्या नंतर त्यांची ओळख पटावी म्हणून पोलिसांना छायाचित्रे शेअर करण्यात आली होती. त्यातूनच आरोपी हे भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यातील मुख्य आरोपी विकास चोहान (२३) हा असून अन्य दोघे आरोपी हे १६ वर्षांचे अल्पवयीन आहेत. त्यांच्या कडून चोरीचे सर्व ७ मोबाईल जप्त केले आहेत. तीन दिवसात पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. घरफोडी - चोरीसाठी या दोघा मुलांचा वापर केला जात असे. अंगाने सडपातळ असल्याने ते चिंचोळ्या जागेतून सुद्धा सहज शिरायचे असे पोलिसांनी सांगितले.