प्रदीप शर्मासह तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:05 AM2021-06-18T04:05:58+5:302021-06-18T04:05:58+5:30
कारमायकल रोडवरील स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने गुरुवारी वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप रामेश्वर शर्मा याच्यासह आणखी ...
कारमायकल रोडवरील स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने गुरुवारी वादग्रस्त एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप रामेश्वर शर्मा याच्यासह आणखी दोघांना अटक केली. सतीश तिरुपती मोठकुरी उर्फ तानी भाई उर्फ विक्की बाबा (वय ४०, रा. महात्मा जोतिराम फुले नगर, मालाड, पूर्व) व मनीष वसंत सोनी (४६, रा. चिंचोली बंदर, मालाड पश्चिम) अशी त्यांची नावे आहेत. मनसुख हिरेनच्या हत्येसाठी या दोघांना प्रदीप शर्माने पैसे दिले होते, त्याचा मृतदेह रेतीबंदर येथे नेऊन कोठे टाकायचा, हेही या दोघांसह अन्य आरोपींना त्यानेच सांगितले होते, असे सूत्रांनी सांगितले.
* एकूण १० जणांना अटक
एनआयएने या प्रकरणात आतापर्यंत एकूण दहा जणांना अटक केली आहे. यामध्ये सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी व सुनील माने हे पोलीस सेवेत कार्यरत तर प्रदीप शर्मा निवृत्त आणि विनायक शिंदे बडतर्फ झालेला आहे. त्याशिवाय या कटात सहभागी असलेले पाचजण खासगी इसम असले तरी ते पोलिसांसाठी खबरी व तोडपाणी करण्याचे काम करत होते. आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
.................................................................