मुंबईत ४ महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा फोन कोणी केला?; तिघे हाती लागताच पोलीस चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 06:46 AM2021-08-08T06:46:20+5:302021-08-08T06:47:07+5:30

तिघा तरुणांना अटक; पोलिसांची धावपळ

Three arrested for making hoax calls to Mumbai Police control room | मुंबईत ४ महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा फोन कोणी केला?; तिघे हाती लागताच पोलीस चक्रावले

मुंबईत ४ महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा फोन कोणी केला?; तिघे हाती लागताच पोलीस चक्रावले

Next

मुंबई : मुंबईत चार महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन करून अफवा पसरविणाऱ्या तिघा तरुणांना मुंबई पोलिसांनी ठाण्यातील शिळफाटा परिसरातून अटक केली आहे. दारूच्या नशेत तर्र झाल्यानंतर मस्करी करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. गणेश शेळके, राजू अंगारे व रमेश शिरसाट अशी त्यांची नावे आहेत.

गटारी अमावस्येनिमित्त शुक्रवारी रात्री पार्टी करून ते खूप दारू प्यायले होते, त्यानंतर त्यांना ही दुर्बुद्धी सुचल्याचे प्राथमिक तपासून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास रेल्वे विभागात तसेच मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात एकाने निनावी फोन करून मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा व अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती. त्यानंतर मुंबई व जीआरपी पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाच्या साहाय्याने शोधमोहीम राबविली. संबंधित चारही परिसरात दोन-अडीच तास कानाकोपरा धुंडाळूनही एकही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

ज्या मोबाइल नंबरवरून फोन आला होता, त्यावर पुन्हा फोन केला असताना तिकडून मला जी माहिती मिळाली आहे ती सांगितली, परत डिस्टर्ब करू नका, असे दरडावीत फोन बंद केला होता. त्याच्या आधारावर निनावी फोन करणाऱ्या तरुणांचा गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुप्त वार्ता विभागाने शोध घेतला असता ते लोकेशन शिळफाटा परिसरात असल्याचे आढळले. तेथे शोध घेण्यात आला असता गणेश शेळके, राजू अंगारे व रमेश शिरसाट सापडले. दारूच्या नशेत मस्करी करण्यासाठी फोन केल्याची कबुली त्यांनी दिली. तिघांना मुंबईला आणून आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील एक जण मूळचा बीड जिल्ह्यातील तर अन्य दोघेही मूळचे जालना येथील असून वाहनचालकाचे काम करतात. 

 

Web Title: Three arrested for making hoax calls to Mumbai Police control room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.