Join us

नवविवाहितेच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

By admin | Published: June 29, 2015 2:24 AM

पत्नीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करत सहा महिन्यांपासून फरार झालेल्या सासरच्या मंडळीना अखेर किन्हवली पोलिसांनी अटक केली.

डोळखांब : पत्नीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करत सहा महिन्यांपासून फरार झालेल्या सासरच्या मंडळीना अखेर किन्हवली पोलिसांनी अटक केली. नवविवाहितेच्या हत्येप्रकरणी नवऱ्यासह सासू आणि सासऱ्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . शहापूर तालुक्यातील साठगाव येथील हर्षला उर्फ मधुरा मिलिंद हजारे हिचा २०१०मध्ये मिलिंद दत्तात्रय हजारे याच्याबरोबर विवाह झाला होता. सासरी होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे ती त्रस्त झाली होती. त्यातच १ डिसेंबर २०१४ रोजी तिचा मृतदेह घराच्या पडवीत ओढणीने टांगलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी किन्हवली पोलिसांनी तपासात चालढकलपणा करून तिचा नवरा मिलिंद, सासरा दत्तात्रय हजारे, सासू विमल हजारे आणि नणंद आरती पवार यांच्यावर मधुरा हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले.दरम्यान, शहापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालात मयत मधुराच्या मानेवर आढळलेला वण हा ओढणीचा नाही हे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेली ओढणी ही मयत मधुराचे वजन पेलू शकत नसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले. यावरून मयत मधुराचा गळा आवळून तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे नमूद करत किन्हवली पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आणि तिघांना बेड्या ठोकल्या. मधुराचा भाऊ किशोर निमसे याने कठोर शिक्षेची मागणी केली आहे. (वार्ताहर)