३७ कोटींच्या हाय स्पीड डिझेल तस्करीप्रकरणी तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 02:10 AM2018-12-31T02:10:30+5:302018-12-31T02:10:44+5:30
दुबईतून मुंबईत आयात केलेल्या प्रतिबंधित हाय स्पीड डिझेलची तस्करी करणारी टोळी महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)ने उध्वस्त केली आहे.
मुंबई : दुबईतून मुंबईत आयात केलेल्या प्रतिबंधित हाय स्पीड डिझेलची तस्करी करणारी टोळी महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय)ने उध्वस्त केली आहे. या प्रकरणी धमेंद्र सजनानी, इंदुशेखर चंद्रा, अंजली दुबे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९ हजार मेट्रिक टन डिझेल जप्त करण्यात आले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३७ कोटी रुपये आहे.
धक्कादायक म्हणजे यामध्ये सीमाशुल्क विभागाच्या एका माजी अधिकाऱ्याचा समावेश आहे. अशा प्रकारचे डिझेल आयात करण्याची परवानगी केवळ सरकारी कंपन्यांना आहे. मात्र, या तीन आरोपींनी संगनमत करुन त्यांच्या कंपनीद्वारे हे डिझेल आयात केले. सीमाशुल्क विभाग व इतर विभागांना संशय येऊ नये, यासाठी त्यांनी यामध्ये इतर पेट्रोकेमिकल मिसळून त्याचे रुपांतर केले व मिक्स्ड हायड्रोकार्बन आॅइल असे संबोधून त्याची आयात करण्यात आली. दुबईतील विविध रिफायनरीद्वारे त्यांनी हे डिझेल मुंबईत आणले. न्हावाशेवा येथून समुद्रीमार्गे हे डिझेल आणण्यात आले. सीमाशुल्क विभागाची फसवणूक करुन, कमी किंमत दाखवून व चुकीची माहिती देऊन हे डिझेल आणण्यात आले. विदेशी व्यापार धोरणातील तरतुदींचा यामध्ये भंग झाला आहे.
तिन्ही आरोपींना डीआरआयने बोलावून सीमाशुल्क विभाग कायदा १९६२ च्या कलम १०८ अन्वये त्यांचा जबाब नोंदवण्यात आला त्यामध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनंतर त्यांनी गुन्हा केल्याचे व सरकारची फसवणूक केल्याचे समोर आले असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सीमाशुल्क कायदा १९६२ अन्वये गुन्हा
डीआरआयला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये फसवणुकीचा हा प्रकार समोर आला. सीमाशुल्क कायदा १९६२ अन्वये त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. डीआरआयचे सह आयुक्त समीर वानखेडे यांनी या माहितीला दुजोरा दिला असून, या प्रकरणी सखोल तपास सुरु आहे. असे आणखी प्रकार सुरु आहेत का? याची माहिती घेतली जात असल्याचे सांगितले.