Join us  

निर्यात माल चोरणाऱ्या तिघांना अटक

By admin | Published: May 07, 2016 12:49 AM

एक्सपोर्ट करण्यासाठी पाठवलेल्या मालाचा अपहार करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड कोटी रुपये किमतीचा चोरीचा कपड्याचा माल जप्त करण्यात

नवी मुंबई : एक्सपोर्ट करण्यासाठी पाठवलेल्या मालाचा अपहार करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून दीड कोटी रुपये किमतीचा चोरीचा कपड्याचा माल जप्त करण्यात आला आहे. चालकाच्या मदतीने कंटेनर जेएनपीटी बंदरावर पोचण्यापूर्वीच माल चोरी केला जायचा.विलेपार्ले येथील व्यापारी अनिल कवाड (४२) यांचा दोन कोटी १७ लाख रुपये किमतीचा कपड्याचा माल चोरीला गेला होता. याप्रकरणी त्यांनी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. नायजेरिया येथे पाठवण्यासाठी २१ टन वजनाचे सिंथेटीक कापड कंटेनरमधून जेएनपीटी बंदराकडे पाठवले होते. कपड्याचा हा माल एस नॅशनल कंटेनर मुव्हर्स या ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारे पाठवला होता. परंतु तो कंटेनर बंदरावर पोचण्यापूर्वीच त्याची चोरी झाली होती. सदर गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी भिवंडी, गुजरात तसेच दिल्ली परिसरात तपास केला असता सदर टोळीची माहिती मिळाली. यानुसार सुभाष जैन (५२), मुकेश शर्मा (३४) व अश्विन शिवाच ऊर्फ अजय (२६) यांना दिल्ली येथून अटक केली असून इतर चौघे फरार असल्याचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी सांगितले. या टोळीचे देशभर जाळे पसरले असून ते एक्सपोर्टच्या मालाची चोरी करायचे. त्यांनीच कवाड यांच्या कपड्याच्या मालाची चोरी केलेली. त्यानंतर चोरीचा हा माल दिल्ली येथील कपडा व्यापाऱ्याला विकला होता. त्यापैकी एक कोटी ७० लाख रुपये किमतीचा चोरीचा माल जप्त केल्याचे आयुक्त रंजन यांनी सांगितले. अटक केलेले तिघेही ट्रान्सपोर्ट कंपन्यांशी संबंधित असून चालकाच्या मदतीने ते एक्सपोर्ट करण्यासाठी कंटेनरमधून पाठवलेल्या मालाची चोरी करायचे. अशाप्रकारे त्यांनी इतरही अनेक गुन्हे केल्याची शक्यता असून त्यासंबंधीचा तपास गुन्हे शाखेचे पथक करत आहे. (प्रतिनिधी)