विक्रोळी मारहाण प्रकरणात तिघांना अटक
By admin | Published: February 23, 2017 07:03 AM2017-02-23T07:03:37+5:302017-02-23T07:03:37+5:30
विक्रोळीत शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सुनील पाटील यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक
मुंबई : विक्रोळीत शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सुनील पाटील यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी पोलिसांनी याच पक्षाचा बंडखोर सुधीर मोरे याच्यासह अन्य साथीदारांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसरीकडे मारहाण करणाऱ्या महिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाटील विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
विक्रोळीच्या प्रभाग क्रमांक १२३ मधून शिवसेनेचे विभाग प्रमुख यांना त्यांच्या वहिनी स्नेहल मोरेना शिवसेनेकडून उभे करायचे होते. सीट नाकारल्यामुळे मोरे यांनी बंडखोरी केली. त्यांच्या वहिनीला अपक्ष म्हणून उभे केले. त्यामुळे मोरेंची पक्षांतून हकालपट्टी करण्यात आली. या ठिकाणी सेनेने विद्यमान नगरसेविका डॉ. भारती बावदाने यांना उमेदवारी दिली. याने वादात भर पडली. गेल्या काही दिवसांपासून मोरे आपल्याला धमकावत असल्याच्या तक्रारी डॉ. बावदाने यांच्यासह कार्यकर्त्यांनी विक्रोळी पार्कसाइट पोलीस ठाण्यात केल्या होत्या. सोमवारी रात्री सुधीर मोरे यांच्यावर पैसेवाटपचा आरोप शिवसैनिकांनी केल्याने हा वाद विकोपाला गेला.
मतदानाच्या दिवशी हा वाद आणखीनच पेटला. मतदान संपल्यानंतर वार्ड क्रमांक १२३चे उपशाखाप्रमुख पाटील यांच्यावर मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पाटील यांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करून पार्कसाइट पोलिसांनी तपास सुरू केला.(प्रतिनिधी)