मुंबई - आपण कितीही प्रगती केली असली तरी आजही महिला आणि तरुणींना दररोज लैंगिक छळाचा, शोषणाचा सामना करावा लागतो हे वास्तव आहे. घरात, नोकरीच्या ठिकाणी किंवा दररोजच्या प्रवासात महिलांना शोषणाला बळी पडावे लागते. छेडछाड, पाठलाग, बलात्कार आणि हत्या या घटना दररोज आपल्या देशात घडत असतात. महिलांवरील बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदे केलेत, संकटकाळात तरुणींच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरु झाल्यात पण इतके सर्व करुनही महिलांविरोधात घडणा-या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. दिल्लीच्या तुलनेत मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित समजले जाते. पण मागच्या काही महिन्यात मुंबईत महिलांविरोधात गुन्हे मोठया प्रमाणावर वाढले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमक्ष हस्तमैथुनाचे प्रकार घडत आहे. आज अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांना हा धक्कादायक अनुभव आला. पण अशा प्रसंगातून जाणऱ्या त्या पहिल्या महिला नाहीत. जाणून घेऊया मागच्या काही महिन्यात मुंबईत घडलेले असेच गंभीर प्रकार.
- मागच्यावर्षी जुलै महिन्यात सीएसटी येथे थांबलेल्या तपोवन एक्सप्रेसमध्ये तरुणींसमोर हस्तमैथुनाचा प्रकार झाला होता. सीएसटीएम स्थानकांवर २९ जून रोजी पहाटे ५.४५ वाजता तक्रारदार तरुणी मैत्रिणीसह तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणार होती. ट्रेन सुटण्यास अवधी असल्याने फलाटावर कोणीही प्रवासी नव्हते. मैत्रिणीची वाट बघत ती एकटीच फलाटावर थांबली. याच संधीचा फायदा घेत, आरोपीने अश्लील चाळे करत, हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, तरुणीने दुसरीकडे पळ काढला. संबंधित तरुणीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तब्बल १३ दिवसांनंतर या प्रकरणाला सोशल मीडियातून वाचा फोडण्यात आली. हा व्हिडीओ रेल्वे पोलिसांच्या निदर्शनात येताच, अवघ्या सहा तासांत त्यांनी अशोक प्रधान (२०) या विकृत तरुणाला बेड्या ठोकल्या.- मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात एका ओला कारच्या चालकाने कारमध्ये त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेच्या समोरच हस्तमैथुन केला. दादरमधल्या शिवाजीपार्क भागात ही घटना घडली. या कारचालकाच्या शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली. एक महिलेने मुलाखतीसाठी जाण्यासाठी ओला कॅब बूक केली होती. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला आहे. पीडित महिला उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील रहिवाशी आहे.
- मागच्यावर्षी जुलै महिन्यात पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर दिवसाढवळया एका मुलीचा विनयभंग झाला. एक तरुणी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लोकलची वाट पाहात उभी होती. त्याचवेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर येते. तरुणी ट्रेन पकडण्याच्या गडबडीत असताना तिथून जाणा-या एका तरुणाने जाणीवपूर्वक तरुणीच्या गुप्तांगाला स्पर्श केला. यानंतर तरुणीने धावत जाऊन स्वत: त्या तरुणाला पकडले.
- मागच्यावर्षी जुलै महिन्यातच पवईमध्ये दुचाकीवरुन आलेल्या एका तरुणाने 19 वर्षीय युवतीला आपल्या पँटची चैन खोलून दाखवली.पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजमधून घरी परतत असताना ही घटना घडली.