Join us  

भिकाऱ्याच्या तीन गोणी नोटा खाक !

By admin | Published: January 14, 2016 4:20 AM

तेलाचा दिवा कलंडून एका भिकाऱ्याच्या झोपडीला अचानक लागलेल्या आगीत नोटांनी भरलेल्या तीन गोणी जळाल्या. कल्याण येथील मोहने परिसरातील लहुजीनगर वसाहतीत ही घटना घडली.

कल्याण : तेलाचा दिवा कलंडून एका भिकाऱ्याच्या झोपडीला अचानक लागलेल्या आगीत नोटांनी भरलेल्या तीन गोणी जळाल्या. कल्याण येथील मोहने परिसरातील लहुजीनगर वसाहतीत ही घटना घडली. या भिकाऱ्याकडे तीन गोणी भरून पैसा असल्याचे समजल्यानंतर कल्याणमध्ये हा विषय चर्चेचा ठरला आहे.मोहम्मद रेहमान याने गेल्या कित्येक वर्षांपासून भीक मागून जमा झालेले पैसे त्याच्या झोपडीतील या गोणींमध्ये भरून ठेवले होते, अशी माहिती त्यांची पत्नी फातिमा यांनी पत्रकारांना दिली. सुमारे २ ते ३ गोणींमध्ये हे पैसे भरून ठेवले होते. त्यामुळे ते किती होते, याबाबत अंदाज लावणे कठीण असले तरी ही रक्कम मोठी असल्याचे बोलले जात आहे. आग विझवल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य आगीत वाचलेले पैसे शोधून गोळा करीत होते. पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या गोणीत ५, १०, २०, ५० आणि १०० रु पयांच्या नोटा होत्या. त्यातील काही नोटा अर्धवट जळालेल्या तर काही सुस्थितीत होत्या. त्या पत्रकारांना दाखवत असताना अचानक या गोणीतून एका प्लॅस्टिकच्या पिशवीतील नोटांचे बंडल बाहेर आले. मात्र या महिलेने ते ताबडतोब पिशवीत टाकून ते लपविले. बुधवारी सकाळी काही पिशव्या भरून पैसे या ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.