लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सध्या काेराेनाच्या ५७ हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांत सक्रिय रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असून वर्षअखेर कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांत ३ टक्क्यांनी घट झाली.
कोरोनाच्या तीव्र संक्रमणाचा काळाचा विचार केला असता नोव्हेंबर महिन्यात दिवसाला ४ हजारांच्या घरात नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले होते. त्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण नऊ हजारांच्या घरात होते. सद्यस्थिती पाहता राज्यासह मुंबईतही कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असून नव्या रुग्णांसह दैनंदिन मृत्यूंमध्ये घट झाली आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने राज्यातील काेराेना पॅझिटिव्हिटीचे प्रमाण १५.३२ टक्क्यांवर स्थिरावले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर असून मृत्युदर २.५७ टक्के आहे.
* घाबरू नका; सॅनिटायझर, मास्कचा वापर करा
राज्याच्या टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, नव्या कोरोना विषाणूविषयी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र खबरदारी बाळगली पाहिजे. उपचारपद्धतीमध्ये बदल करण्याची गरज नाही. मात्र, मास्क, सॅनिटायझरचा वापर, स्वच्छता, शारीरिक अंतर या गोष्टी जीवनशैलीचा भाग म्हणून अंगीकारल्या पाहिजेत.
.........................