पुणे : आई भीक मागायला लावते, मारहाण करते म्हणून चिडलेल्या ९ वर्षांच्या मुलीने आपली ६ वर्षांची बहीण आणि ५ वर्षांच्या भावाला घेऊन घरातून पलायन केले होते. एकाचवेळी तीन लहान मुले पळून गेल्याने पोलिसांचे धाबे दणाणले. लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने ४ पथके नेमून त्यांचा शोध घेतल्यावर चार तासांच्या प्रयत्नांनंतर कॅम्पमध्ये ही मुले आढळून आली.
कदम वाक वस्तीत राहणाऱ्या एका ३० वर्षांच्या महिलेने लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार महिला नागपूरची, तिचा पती हैदराबादचा आहे. दोघेही पुण्यात आले. पती रेल्वे स्टेशनवर काम करतो. महिला रमजानमध्ये मशिदीबाहेर भीक मागते व मुलांनाही भीक मागायला सांगत होती. त्यांची ९ वर्षांची मुलगी चिडली. रविवारी सायंकाळी ती बहीण-भावाला घेऊन घरातून बाहेर पडली. रात्री मुले घरी नसल्याने महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना कुरेशी मशिदीबाहेर एका सतरंजीवर ही मुले झोपलेली आढळून आली.
मुलगी म्हणाली... पोलिसांनी चौकशी केल्यावर मुलीने सांगितले की, आई सतत रागावते. मारहाण करते, मारते म्हणून मी भाऊ व बहिणीला घेऊन बसने पुलगेटला आले. तेथून कॅम्पमध्ये फिरत मशिदीबाहेर थांबले होते.