विक्रीकर न्यायाधिकरणाची तीन शहरांत खंडपीठे , तारांकित हॉटेलांसाठीच्या किमान जागेची अट शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:57 AM2017-09-21T04:57:26+5:302017-09-21T04:57:27+5:30
महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाची खंडपीठे मुंबई, पुणे, नागपूर या तीन ठिकाणी पुढील दोन वर्षासाठी स्थापन करण्यास मान्यता मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाची खंडपीठे मुंबई, पुणे, नागपूर या तीन ठिकाणी पुढील दोन वर्षासाठी स्थापन करण्यास मान्यता मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे प्रलंबित प्रकरणांबरोबरच नव्याने दाखल होणाºया प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होणार आहे.सध्या माझगाव मुंबई येथील विक्रीकर विभागाच्या मुख्यालयात महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाची पाच खंडपीठे कार्यरत आहेत. ती मुंबई परिसरासाठी सोयीची असली तरी उर्वरित राज्याच्या सोयीसाठी नवीन खंडपीठे स्थापन होणे आवश्यक होते. त्यानुसार मुंबई खंडपीठांतर्गत मुंबई आणि नाशिक विभाग, पुणे खंडपीठांतर्गत पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद विभाग तसेच नागपूर खंडपीठांतर्गत नागपूर विभागातील जिल्ह्यांचा समावेश असेल.
यापूर्वी मुंबईसाठी तारांकित हॉटेल उभारणीसाठी, किमान भूखंड क्षेत्राची असलेली विकास नियंत्रण नियमावलीतील अट काढली आहे. तारांकित हॉटेलांच्या उभारणीस चालना देण्याच्या हेतूने स्थानिक संस्थांच्या विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.