प्रशांत माने ,डोंबिवलीसमाधानकारक पटसंख्या, पुरेसे शिक्षक आणि सुस्थितीत वास्तू असे चित्र कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पं. मदन मोहन मालवीय या हिंदी प्राथमिक विद्यालयात दिसत असले तरी त्या संपूर्ण वास्तूच्या स्वच्छतेचा भार शिक्षण मंडळाला स्वत:च उचलावा लागतो आहे, तर ३ संगणक बंद असून ते शिकविण्यासाठी शिक्षकच नाहीत.येथील पश्चिमेकडील महात्मा गांधी रोडवर केडीएमसीच्या पु.भा. भावे सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ही शाळा आहे. या इमारतीत पहिल्या मजल्यावर तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या मतदार नोंदणीचे आणि आॅनलाइन सेतू सेवा उपकेंद्र आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिकतात. येथील पटसंख्या ४०० च्या आसपास असून मुख्याध्यापकांसह आठ शिक्षक येथे कार्यरत आहेत. शाळेत ३ संगणक असून त्यातील २ बंदावस्थेत आहेत. संगणक शिकविण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकाची नेमणूक केलेली नाही. संबंधित इमारतीत शाळेव्यतिरिक्त सरकारी कार्यालये आहेत. परंतु, स्वच्छतेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनालाच पार पाडावी लागत आहे. शाळेला स्वतंत्र सफाई कर्मचारी दिलेला नाही. त्यामुळे स्वच्छतेसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा लागतो. सद्य:स्थितीला पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने वास्तूच्या प्रवेशद्वारावर पाण्याचे डबके साचले असून ते पार करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करावा लागत आहे.
तीन संगणक बंद, शिक्षकही नाहीत
By admin | Published: July 04, 2015 11:34 PM