तीन कस्टम अधिकारी निलंबित; विदेशातून आयफोन आणला म्हणून उकळले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 11:39 AM2023-02-17T11:39:41+5:302023-02-17T11:41:00+5:30
परदेशातून आयफोन आणला म्हणून प्रवाशाकडून उकळले पैसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जीपेच्या माध्यमातून प्रवाशाकडून ३० हजार रुपये उकळणाऱ्या कस्टम अधिकाऱ्याचा कारनामा ताजा असतानाच आता परदेशातून आयफोन आणला म्हणून प्रवाशाची अडवणूक करून त्याच्याकडून पैसे लाटल्याचा प्रकार मुंबई विमानतळावर उघडकीस आला आहे. या प्रकरणी कस्टमच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे निलंबित करण्यात आलेल्या तिघांपैकी एक जण प्रोबेशनरी अधिकारी असून त्याची ही पहिलीच नेमणूक आहे. कस्टम सेवेत पाच वर्षे सेवा पूर्ण झालेल्या व्यक्तीलाच विमानतळावर नेमणूक दिली जाते, या साध्या नियमालाही या प्रकरणात हरताळ फासण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून एका व्यक्तीने वैयक्तिक वापरासाठी आयफोनची खरेदी केली होती. विमानतळावर कस्टम विभागाच्या तपासात ही बाब उघड झाली. प्रवाशाकडे फोनच्या खरेदीचे बिलही होते, तसेच त्यासाठी लागणारे यथोचित शुल्क भरण्याचीही त्याची तयारी होती. मात्र, विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या नितीशकुमार या अधीक्षकाने त्याला हे कायद्याचे उल्लंघन असून अटक होईल, अशी धमकी दिली. यातून बाहेर पडायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असेही संबंधित प्रवाशाला सांगितले.
स्वच्छतागृहात नेऊन घेतले पैसे
नितीशकुमारने त्याचा सहकारी निरीक्षक देवेशकुमार पांडे आणि हवालदार जीजी फलेभाई यांना प्रवाशाची अधिक चौकशी करायला सांगितली. या दोघांपैकी हवालदार जीजी फलेभाई याने त्या प्रवाशाला विमानतळाच्या आगमन हॉलनजीकच्या एका स्वच्छतागृहात नेऊन त्याच्याकडून पैसे उकळले.
अशी झाली कारवाई
प्रवाशाने विमानतळाबाहेर पडल्यानंतर कस्टम विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची ऑनलाइन तक्रार केली.
यानंतर अधिकाऱ्यांनी या प्रवाशाला हवालदार स्वच्छतागृहात नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून ते पुरावा म्हणून या प्रकरणी जोडले.
या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सकृतदर्शनी या तीनही अधिकाऱ्यांनी या प्रकरणात गडबड केल्याच्या निष्कर्षाप्रत उच्चाधिकारी आले आणि त्यांनी बुधवारी या तीनही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
प्रोबेशनरी अधिकारी असतानाही नितीशकुमारला विमानतळावर नेमणूक कशी मिळाली, याची चर्चा वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्यांमध्ये आहे.