मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन तीन दिवस लोटले तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. भाजपमध्ये खातेवाटप ठरले असले तरी मुख्यमंत्री शिंदे गटात काहीशी धुसफूस असल्याची जोरदार चर्चा या निमित्ताने आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडावंदन होणार की नाही याची उत्सुकता असताना आता झेंडावंदनापुरती जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार ९ ऑगस्टला सकाळी झाला. त्यानंतर खातेवाटप दोन-तीन दिवसांत जाहीर केले जाईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांना सांगितले होते. मात्र, अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. आता झेंडावंदनासाठीची सोय म्हणून मंत्र्यांवर जबाबदारी सोपविली आहे. सूत्रांनी सांगितले की, कोणती खाती कोणाला द्यायची यावर शिंदे गटाकडून एकमत झालेले नाही. काही मंत्र्यांना देऊ केलेली खाती नको आहेत आणि ते विशिष्ट खात्यांसाठी अडून बसले आहेत.
फडणवीस नागपूरचेच पालकमंत्री!
झेंडावंदनासाठी मंत्र्यांची जाहीर केलेली नावे ही पालकमंत्री म्हणूनही कायम राहतील अशी चर्चा आहे. तसे गृहित धरल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे, तर चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपचे रवींद्र चव्हाण यांना मिळू शकते.