मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस लांबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
सप्टेंबर मध्यानंतर मान्सून प्रामुख्याने माघारी फिरत असतो. मात्र, यावर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाचा मुक्काम लांबल्याचे दिसून येत आहे. देशाच्या पूर्व व मध्य भागात आजपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. मागील काही दिवसांपासून अधूनमधून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाचा अंदाज आहे, तर मुंबई शहरासह नवी मुंबई, पनवेल, पालघर, ठाणे जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यात सर्वत्र पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.