संजय घावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारत सरकारच्या 'स्त्री शक्ती पुरस्कार' आणि युएनएफपीएच्या 'क्रिएटिव्ह एक्सलन्स पुरस्कार' विजेत्या कॉस्च्युम डिझायनर, क्युरेटर आणि वस्त्रोद्योग कार्यकर्त्या, संध्या रामन यांचे 'टू स्टिच ऑर नॉट' प्रदर्शन मुंबईत भरणार आहे. विनामूल्य असलेल्या या प्रदर्शनात कलाप्रेमींना नृत्य वेशभूषेच्या तीन दशकांचा इतिहास पाहायला मिळेल.
वेशभूषेच्या क्षेत्रामध्ये तीन दशकांहून अधिक काळ गाजवणाऱ्या संध्या रामन यांचे 'टू स्टिच ऑर नॉट' हे प्रदर्शन २५ ते २९ एप्रिल या कालावधीत नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समधील दिलीप पिरामल आर्ट गॅलरीमध्ये भरणार आहे. या प्रदर्शनाद्वारे त्यांच्या तीन दशकांच्या प्रवासातील ओडिसी नृत्याच्या कॉस्च्युम डिझायनींगच्या क्षेत्रातील कारकीर्द उलगडली जाईल. यात १० ते १२ अप्रतिम पोशाख पुतळ्यांवर प्रदर्शित केले जातील. याखेरीज ५० छायाचित्रे आणि चार-पाच इंस्टॉलेशन्सदेखील असतील. संध्या यांचा कॉस्च्युम डिझायनर म्हणून प्रवास उल्लेखनीय आहे. मल्लिका साराभाई, दिवंगत अस्ताद देबू, अदिती मंगलदास, गीता चंद्रन, मालविका सारुक्काई, अनिता रत्नम आदी प्रतिष्ठित नर्तकांचे सादरीकरण संध्या यांच्या पोशाखांनी सुशोभित केले आहे. महिला कारागीरांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचा 'स्त्री शक्ती पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला आहे.
नृत्याचे पोशाख डिझाईन करणाऱ्या व्यवसायाला भारतात अजूनही लक्षणीय मान्यता मिळालेली नाही. याबाबत संध्या म्हणाल्या की, भारतात १५०० हून अधिक डिझाइन स्कूल्स असूनही बहुतेक विद्यार्थ्यांचा कल ग्लॅमरमुळे फॅशन डिझाइनकडे आहे. पण कलाकार हळूहळू नृत्य वेशभूषेचे महत्त्व ओळखत आहेत. नृत्य प्रकार समजून घेणे, त्यातील नैतिकता, संस्कृती, मापदंड आणि या क्षेत्राच्या सीमा समजून घेण्याची गरज आहे. तरुणाईला लवकरच त्यातला अर्थ सापडेल आणि हे प्रदर्शन त्या दिशेने जागरूकता निर्माण करण्याचे काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.