मुंबई : मुसळधार पाऊस अधूनमधून हजेरी लावत असल्याने मुंबईत शुक्रवारी दिवसभरात इमारतीचा भाग कोसळण्याच्या तीन घटना घडल्या. फोर्ट परिसरातील दुर्घटनेतून सहा रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अंधेरी पूर्व येथे इमारतीचा भाग कोसळून दोन रहिवासी जखमी झाले. तर भेंडीबाजार येथे इमारतीच्या सार्वजनिक शौचालयाचा भाग कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणी जखमी झालेले नाही.अंधेरी पूर्व येथे मध्यरात्री १२.३३च्या सुमारास नवीन एअरपोर्ट कॉलनी, मरोळ पाइपलाइनजवळ, लालेवाडी येथे एका इमारतीतील खोलीच्या गॅलरीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत मोरगन नायडू (वय ४५) व अरविंद नायडू (वय २१) हे दोन रहिवासी जखमी झाले. त्यांना तत्काळ जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी मोरगन यांना उपचार करून घरी पाठविण्यात आले. तर अरविंद नायडू या तरुणाला उपचारासाठीच रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.मात्र शुक्रवारी सकाळी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरातील म्हाडाच्या उपकरप्राप्त ‘अहमद’ या चारमजली इमारतीचा भाग कोसळला. मोडकळीस आलेली ही इमारत काही दिवसांपूर्वी खाली करण्यात आली होती. तरीही या इमारतीत दोन कुटुंबे राहत होती. शुक्रवारी सकाळी १०.४२ वाजताच्या सुमारास इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला.>दोरखंड, शिड्या टाकून सहा जणांना काढले बाहेररहिवासी आणि अन्य दोन अशा सहा लोकांना बाजूच्या इमारतीतून दोरखंड व शिड्यांच्या साह्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. इमारतीखाली उभ्या असलेल्या काही वाहनांचे इमारतीचा भाग कोसळल्याने नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. भेंडीबाजार येथे शुक्रवारी सकाळी ११.५४ वाजताच्या सुमारास मुबारक या तळमजला अधिक तीन मजली इमारतीच्या सामायिक शौचालयाचा भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.>फोर्ट दुर्घटनेतील जखमींची नावे -प्रफुल्ल वारा (वय ६८), प्रयाग वारा (४०), ठाकूर वारा (५०), रवी भाई (४३), कोकिळाबेन (४३).सप्टेंबर महिन्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. २० दिवसांमध्ये १०३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९५४ मध्ये ९०४ मिमी पाऊस झाला होता.
मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी पडझडीच्या घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 2:00 AM