मातीखाली दबल्याने दहा जणांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे विक्रोळीतील सूर्यानगर येथे झालेल्या दुर्घटनेत जाधव, विश्वकर्मा आणि तिवारी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातील कुणी पत्नी आणि मुलांना गमावले तर कोणी आई, वडील, भावंडांना गमावले आहे. या दुर्घटनेत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे.
विक्रोळी सूर्यानगर परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अतिवृष्टीमुळे येथील कुटुंबीय जीव मुठीत घेऊन होते. रात्री झोपेत असताना डोंगराला लागून असलेली ७ घरे कोसळली. यात तीन घरे मातीखाली दबली गेली. स्थानिकांकडून बचावकार्य सुरू झाले. पोलीस, अग्निशमन दलानेही घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये ४ पुरुष, ३ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. याच भागात गेल्या वर्षीदेखील दरड कोसळल्यामुळे दुर्घटना घडली होती.
फुलांचा व्यवसाय असणारे तिवारी कुटुंबीयांमधील कर्ता पुरुष फुले आणण्यासाठी घराबाहेर गेले होते. पहाटेच्या सुमारास घरी परतले तेव्हा त्यांचे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. यात त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. २३ वर्षीय सादनी रामनाथ तिवारी थोडक्यात बचावली आहे. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जाधव दाम्पत्याचाही यात मृत्यू झाला. तर विश्वकर्मा कुटुंबीयातील एक जण पावसामुळे घरात जागा होत नसल्यामुळे जवळच्या बालवाडीत झोपण्यासाठी गेला होता. तो बचावला मात्र त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
फक्त मलबा उरला...
मतांसाठी घरे उभारली जातात. मात्र त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. घटनेची माहिती मिळताच आम्ही तेथे पोहचलो. तेव्हा फक्त मलबाच उरलेला दिसला. आम्ही शक्य तसे लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने यावर वेळीच योग्य मार्ग काढणे गरजेचे आहे. अन्यथा असे बळी जात राहणार असे स्थानिक रहिवासी राहुल डोंगरे यांनी सांगितले.
....
दोन वर्षापूर्वीच बांधली संरक्षक भिंत
दोन वर्षांपूर्वी येथे संरक्षक भिंत उभारण्यात आली. मात्र त्याचेही बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक भाजप पदाधिकारी रमेश सिंह यांनी केला आहे.
मृतांची नावे... १) रामनाम.................................. नारायण प्रसाद तिवारी, वय ५५
२) कामलादेवी रामनाथ तिवारी, वय ४५
३)अंकित रामनाथ तिवारी, २३
४) आशीष चंदूलाल विश्वकर्मा, १५ वर्षे
५) श्रीमती किरण हंसराज विश्वकर्मा, ३२ वर्षे
६) प्रिन्स हंसराज विश्वकर्मा, ११ वर्षे
७) पिंकी हंसराज विश्वकर्मा, १४ वर्षे
८) साहेबराव मधुकर जाधव, ४५ वर्षे
९) कल्पना साहेबराव जाधव, ३५ वर्षे
१०) कमलेश मोतीलाल यादव, ४० वर्षे