टाटानगरमधील १२३ कुटुंबांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:52 AM2019-07-31T02:52:35+5:302019-07-31T02:52:57+5:30

चुनाभट्टी येथील प्रकार : गेली २० वर्षे रहिवासी न्यायाच्या प्रतीक्षेत

Three families were killed in Tatanagar | टाटानगरमधील १२३ कुटुंबांचा जीव टांगणीला

टाटानगरमधील १२३ कुटुंबांचा जीव टांगणीला

Next

मुंबई : चुनाभट्टी येथील टाटानगरची ७० वर्षे जुनी इमारत अत्यंत जीर्ण झाली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चुनाभट्टी येथील स्वदेशी मिलच्या कामगारांसाठी ७० वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. स्वदेशी मिलमधील कामगारांचे कुटुंबीय येथे राहतात. इमारत जीर्ण झाल्याने अनेक जण घर सोडून दुसरीकडे राहायला गेले असले, तरी अजूनही १२३ कुटुंब या इमारतीत वास्तव्यास आहेत.

स्वदेशी मिल २००० साली बंद पडली. तेव्हापासून येथील इमारतीच्या पुनर्विकासचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. इमारत धोकादायक असल्याने महानगरपालिका रहिवाशांना घर रिकामे करायला सांगत आहे, परंतु घरांचे भाडे येथील रहिवाशांना न परवडण्यासारखे आहे. त्यात एकदा घर सोडून गेलो, तर पुन्हा या जागी नवीन घर मिळेल, याची शाश्वती नसल्याने रहिवासी घर सोडून जाण्यास तयार नाहीत. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे लोकप्रतिनिधीदेखील याकडे लक्ष देत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. इमारतीची सर्व बाजूने व सर्व घरांमध्ये पडझड झाल्यामुळे रहिवासी रोज जीव मुठीत घेऊन राहत आहेत. इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात घनदाट झाडी वाढली आहे. तसेच कचरा वाढल्याने इमारतीत साप शिरण्याच्या घटना वाढल्या आहेत.
डोंगरीमध्ये इमारत कोसळल्यानंतर मुंबईत धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा धोकादायक इमारती कोसळून अजून किती निष्पाप नागरिकांचे जीव जाणार आहेत, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत. सोमवारी इमारतीच्या तुटलेल्या व धोकादायक कठड्यावरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि चुनाभट्टीतली ही धोकादायक इमारत समोर आली.

रहिवासी काय म्हणतात...
कामगारांना मिलकडून देणी येणे बाकी आहेत. मिल बंद झाल्यापासून कुठलाच कामगार नोकरीवर नाही. त्यात आजूबाजूच्या परिसरात घरभाडी गगनाला भिडली आहेत. प्रशासनदेखील आम्हाला राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था देत नाही. मग आम्ही घर सोडून नक्की जायचे तरी कुठे?
- महिंद्रापाल बजाज.

मिल प्रशासनाचे प्रकरण २००० सालापासून न्यायप्रविष्ट आहे, परंतु टाटानगर इमारतीचे प्रकरण २०१२ पासून न्यायप्रविष्ट आहे. ज्यात आमचे म्हणणे एवढच आहे की, सरकारने ही इमारत पुनर्विकासासाठी कोणाच्याही ताब्यात द्यावी. अगदी ही इमारत पुनर्विकासासाठी रहिवाशांच्या ताब्यात दिली तरी चालेल, पण या प्रकरणात आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या.
- प्रदीप ठाकूर.

जोरात पाऊस पडायला लागल्यावर भीतीचे वातावरण निर्माण होते. अनेकदा घरात स्लॅबची पडझड होत असते. यामुळे पूर्ण घरात स्लॅबच्या खाली प्लॅस्टिक बांधले आहे. रात्रीच्या वेळी इमारतीत अंधार असल्यामुळे घरातून बाहेर पडणे अशक्य होते. सिलिंडरसारख्या जड वस्तू घरात नेताना मोठी कसरत करावी लागते. - छाया कांबळे.

इमारत सर्व बाजूंनी धोकादायक असल्याने, लहान मुलांवर कायम लक्ष ठेवावे लागते. इमारतीच्या तुटलेल्या भागातून माझा मुलगा तिसºया मजल्यावरून पडून जखमी झाला होता.
- रवींद्र ओजाळे.

Web Title: Three families were killed in Tatanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.