मुंबई : गेल्या २४ तासांत म्हणजे बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात तब्बल ३ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. अंधेरी पूर्वेकडील नंदधाम इंडस्ट्रियल इस्टेट येथे बुधवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास, नरिमन पॉइंट येथील जॉली मेकर चेंबर २ येथे गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास, तर लोअर परळ येथील रघुवंशी मॉल कम्पाऊंड येथील पी २ इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.अंधेरी पूर्वेकडील नंदधाम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये बुधवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. एकमेकांना लागून असलेल्या तीन ते चार गाळ्यातील डिझेल आॅईल ड्रम, प्लास्टिक पॅकेजिंग साहित्याला ही आग लागली. गुरुवारी सकाळी पाच वाजता आग विझवण्यात जवानांना यश मिळाले. दरम्यान, आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान घोष जखमी झाले. त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.लोअर परळमध्ये धुराचे लोटलोअर परळ येथील रघुवंशी मॉल कम्पाऊंड येथील पी २ इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी आग लागली. व्यावसायिक इमारतीचा तळमजला, पहिला आणि दुसरा मजला आगीमुळे धुराच्या छायेखाली गेला होता. आठ फायर इंजिन, सहा जम्बो टँकरच्या मदतीने येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.