मुंबई : सत्तेसाठी काहीपण असे चित्र या वेळच्या महापालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. नगरसेवकपद राजकीय कारकिर्दीची पहिली शाळा मनाली जाते. बहुतांशी आमदार आधी नगरसेवक असल्याचे दिसून येते. मात्र तीन माजी आमदारांनी आपली राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी पुन्हा पहिलीपासून सुरुवात केली आहे. शिवसेना, भाजपा आणि मनसेचे हे तीन नेते नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरले आहेत.भाजपाने आपल्या पक्षाचे प्रवक्ते अतुल शाह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. शाह यांनी आमदारपद भूषवल्यानंतर पुन्हा विधान परिषदेसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र त्यांच्या पदरात महापालिकेचे तिकीट पडले आहे. भाजपा महापालिकेत सत्तेवर येताच शाह यांची महत्त्वाच्या पदावर वर्णी लागेल. तर विक्रोळीतील माजी आमदार मनसेचे मंगेश सांगळे यांनी भाजपामध्ये प्रवेश मिळवून उमेदवारी अर्ज भरला आहे.शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी महापौर व आमदार ही दोन्ही पदे भूषवली आहेत. मात्र आमदारकीची दुसरी संधी पक्षाने नाकारल्यानंतर राऊत यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला होता. परंतु दादरचा गड मनसेच्या ताब्यातून खेचून आणण्यासाठी शिवसेनेला तेवढ्याच ताकदीच्या उमेदवाराची गरज होती. यासाठी विशाखा राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेचे गटनेते स्वप्ना देशपांडे यांच्याशी त्यांची लढत असणार आहे. (प्रतिनिधी)पती-पत्नीला फेररचनेमुळे जॅकपॉट- प्रभाग फेररचनेचा फटका बसून बऱ्याच जणांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली असताना काही ठिकाणी मात्र याउलट परिस्थिती दिसून येत आहे. भायखळा ‘ई’ वॉर्डमधील पती-पत्नी दोघांनाही फेररचनेचा फायदा झाला असून त्या दोघांनाही तिकिटाच्या स्वरूपात लॉटरी लागली आहे. - शिवसेनेचे माजी नगरसेवक यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी यामिनी जाधव मागील निवडणुकीत २०८ व २०७ मधून रिंगणात उतरले होते. त्या वेळी यामिनी जाधव विजयी झाल्या, तर यशवंत जाधव पराभूत झाले. मात्र यंदाच्या वेळी प्रभाग फेररचनेमुळे २०७, २०८ प्रभागांत बदल झाले आहेत. - आता २०९ खुला व २१० इतर मागासवर्गीय महिला म्हणून आरक्षित झाला आहे. परिणामी, या दाम्पत्याला आता प्रभागांची अदलाबदली करावी लागली आहे. एका बाजूला उमेदवारी न मिळाल्याने पती-पत्नी बंडखोरी करत असल्याची उदाहरणे समोर असताना या ठिकाणी दोघांनाही पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
तीन माजी आमदार शर्यतीत
By admin | Published: February 05, 2017 4:23 AM