मुंबई : व्हिसा रद्द करण्यासाठी मुंब्रा येथील त्रिकुटाने सौदी अरेबियाच्या बनावट स्टॅम्पचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी कफ परेडमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सायनचे रहिवासी असलेले मुझम्मील अब्दुल रझाक नदाफ (३१) हे मागील ३ वर्षांपासून कफपरेड येथे असलेल्या सौदी दूतावास कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सौदी अरेबियात नोकरी मिळविण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत व्हिसा मिळवितात. मात्र, काही कारणास्तव त्यांचे सौदी अरेबियात नोकरी करण्याचे रद्द झाल्यास, त्यांना ज्या कंपनीने बोलाविले असेल, ती कंपनी त्या व्यक्तीच्या नावाने पत्र तयार करून, चेंबर आॅफ कॉमर्स, सौदी अरेबिया यांची मान्यता घेऊन, कंपनीमार्फत आलेल्या व्यक्तीला व्हिसा रद्द केल्याबाबतचे पत्र पाठविते. त्यानुसार, पुढे व्हिसा रद्द करण्याची प्रक्रिया पार पडते.
नदाफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी दलाल कंपन्यांकडून व्हिसा रद्द करण्याबाबत आलेल्या कागदपत्रांची पडताळणी करत असताना, त्या कागदपत्रांबर बनावट स्टॅम्प दिसून आले. यात अल हुदईफ, शुुक्रिया ट्रॅव्हल, एच. के. इंटरनॅशनल, सलमान एजन्सी, अनिस एन्टरप्राइज,अल सालेह एन्टरप्राइजचा समावेश आहे. ही बाब डिप्लोमेट अधिकारी मुखहीम यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी वरिष्ठांना याबाबत कळविले.
याबाबत अल हुदाईफच्या प्रमुख अंजुम कारभारी यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा बुधवार, २१ तारखेला त्यांनी दोघांना समोर उभे केले. त्यांच्या चौकशीत दुकलीने सौदी अरेबिया देशातील ४ बनावट स्टॅम्पचा वापर करून फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी मुंब्राच्या शाकीर आलम शेख (२७), अब्दुल रहमान अब्दुल खालीक (२८), ओबिद रहमान (३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याकडील स्टॅम्प पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी ते अधिक तपास करत आहेत.