- प्रज्ञा म्हात्रे, ठाणेएकांकिका, नाटक, एकपात्री सादरीकरण करत यंदाच्या नाट्यसंमेलनात किशोर, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक अशा कलावंतांच्या तीन पिढ्या एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातून आतापर्यंत ३० कलाकारांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या सादरीकरणात ठाण्यातील कलाकारांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. ठाण्यात ९६ वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलन १९, २० व २१ फेब्रुवारीला होत आहे. या काळात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यापैकी २०, २१ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत टाऊन हॉलच्या बंदिस्त सभागृहात किशोरवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक कलाकारांना एकपात्री प्रवेश सादर करण्याची संधी मिळणार आहे. यतीन ठाकूर व मेघना साने यांच्यावर या सादरीकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. एका कलाकाराला एक प्रवेश सादर करण्यासाठी १५ मिनिटे मिळतील. नाटकाशी संबंधित असलेल्या नाना कला या एकपात्रीतून सादर करता येतील. यात आतापर्यंत शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. त्याचबरोबर, ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. देशविदेशांत शशी जोशींनी फडकावला एकपात्रीचा झेंडाठाण्यात व्यावसायिक रंगमंचावर तसेच अमेरिकेत जाऊन एकपात्री सादर करणारे शशी जोशी हे पहिले कलाकार. पुढे तर त्यांना एकपात्री करणारे शशी जोशी म्हणून ओळखले जाऊ लागले.म्हणूनच, एकपात्री सादरीकरण रंगमंचाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. नाट्यरंगकर्मी म्हणून ते १९६८ सालापासून कार्यरत होते. नाट्याभिमानी ही स्वत:ची हौशी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. १९७२ साली श्याम फडकेलिखित ‘बायको उडाली भुर्र’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी पदार्पण केले. १९८५ साली ‘उचक्या’ आणि १९९० साली त्यांनी ‘कॉकटेल’ या एकपात्री कार्यक्रमाचा शुभारंभ केला. आचार्य अत्रे जन्मशताब्दी वर्षात १९९७ साली अत्रे आख्यान हा अत्रेंचे कर्तृत्व सांगणारा एकपात्री कार्यक्रम केला. प्रत्येक नाट्यसंमेलनात एकपात्री सादरीकरण केले जातात. या संमेलनात ठाण्यातील कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. नाट्यसंमेलनात आजपर्यंत झालेल्या एकपात्री सादरीकरणात किशोरावस्थेतील कलाकार व ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश नव्हता. यंदाच्या संमेलनात या कलाकारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल.- यतीन ठाकूर, एकपात्री सादरीकरण समितीप्रमुख
तीन पिढ्या रंगमंचावर
By admin | Published: February 07, 2016 12:32 AM