मनोहर कुंभेजकर । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे सैनिकांमध्ये थेट संवाद होत नसल्याची ओरड संघटनेत पूर्वीपासून होती. ही उणीव भरून काढण्याचा निश्चय सध्या राज ठाकरे यांनी केलेला आहे. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी संवाद बैठकांचे आयोजन मनसेने सुरू केले आहे. आतापर्यंत १५ विधानसभा क्षेत्रामध्ये या बैठका झाल्या आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या बैठका चालणार आहेत. विशेष म्हणजे या बैठकांमध्ये ठोस निर्णय घेतले जात आहेत. राज ठाकरे यांनी आतापर्यंत तीन विभागाध्यक्षांची उचलबांगडी केली असून या कारवाईमुळे अन्य विभागाध्यक्ष चांगलेच बिथरले आहेत. मुंबईतील विधानसभा क्षेत्रात पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यात येत आहे. या संवाद बैठकांमुळे मनसे सैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. या बैठकांना मनसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सर्व बैठका बंद दरवाजाआड होत आहेत. त्यामुळे ज्या पदाधिकाऱ्यांबाबत नाराजी आहे, त्यांच्या तक्रारी कोणी केल्या हे गुलदस्त्यात राहत आहे. काम न करणारे पदाधिकारी मात्र त्यामुळे सध्या चिंतेत आहेत. मुंबईपाठोपाठ ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पुणे येथेही अशाच संवाद बैठका राज ठाकरे स्वत: घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत या संवाद बैठका होत असून राज ठाकरे यांच्याबरोबर मनसेचे नेते राजन शिरोडकर व अविनाश अभ्यंकर, सचिव प्रमोद पाटील आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांचे पाच जणांचे पॅनल विधानसभेतील मनसेचे उपशाखाध्यक्ष, शाखाध्यक्ष यांच्या वैयक्तिक भेटी घेत असून त्यांची मते जाणून घेतली जात आहेत.
तीन विभागाध्यक्षांची उचलबांगडी
By admin | Published: June 27, 2017 3:45 AM