सरकारी बँकांमध्ये तीन तास, खासगी बँकेत अर्धा तास
By admin | Published: November 11, 2016 03:55 AM2016-11-11T03:55:22+5:302016-11-11T03:55:22+5:30
खासगी बँकांपेक्षा सरकारी बँकांमध्ये नागरिकांचा अधिक विश्वास असल्याने याच बँकांना नागरिक पसंती देतात. नोटा बदलण्याच्या पहिल्याच दिवशी हीच
मुंबई : खासगी बँकांपेक्षा सरकारी बँकांमध्ये नागरिकांचा अधिक विश्वास असल्याने याच बँकांना नागरिक पसंती देतात. नोटा बदलण्याच्या पहिल्याच दिवशी हीच काहीशी परिस्थिती दिसून आली. बँका उघडण्याच्या वेळेआधीच सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांनी पैसे भरण्यासाठी रांगा लावल्याचे दिसून आले.
पैसे काढण्यासाठी जेथे खाते आहे, त्याच बँकेच्या शाखेतून पैसे मिळणार असा अनेकांचा समज होता. त्यामुळे खाते असलेल्या बँकांबाहेर मोठ-मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. तर दुसरीकडे काही खासगी बँकांकडे मात्र नागरिकांची गर्दी कमी होती. त्यामुळे खाजगी बँकांमध्ये ग्राहकांना अर्ध्या तासात पैसे बदलून मिळत होते. सरकारी बँकांमध्ये मात्र पैसे मिळविण्यासाठी ग्राहकांना सुमारे तीन तास ताटकळत राहावे लागल्याची वेळ आली होती.
काही ग्राहकांनी बँकेमधून मिळालेल्या फॉर्मवर ४ हजारांपेक्षा जास्त रक्कम लिहिल्याने बँक कर्मचाऱ्यांकडून हे फॉर्म स्वीकारले जात नव्हते. त्यामुळे अनेक ग्राहकांना तीन तास उभे राहूनही पैसे न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी होती. (प्रतिनिधी)