Join us

बेस्टच्या ताफ्यात तीनशे इलेक्ट्रिक बसगाड्या; नोव्हेंबर अखेरीस दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 7:55 AM

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३१०० बसगाड्या असून मिनी, मिडी वातानुकूलित बसगाड्या टप्प्याटप्प्याने घेण्यात येत आहेत.

मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही अद्याप रेल्वे सेवा बंद असल्याने बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने नोव्हेंबरपर्यंत बस ताफ्यात तीनशे इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून सप्टेंबर अखेरीस आठ बसगाड्या येणार आहेत.बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३१०० बसगाड्या असून मिनी, मिडी वातानुकूलित बसगाड्या टप्प्याटप्प्याने घेण्यात येत आहेत. मात्र एकीकडे आयुर्मान संपलेल्या सुमारे ९०० बसगाड्या भंगारात काढण्यात येत असताना १२०० पैकी केवळ साडेचारशे मिनीबस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी बसगाड्यांचा ताफा अधिक असण्याची गरजआहे. तसेच इलेक्ट्रिकबसगाड्यांसाठी प्रवाशांकडूनही वाढती मागणी आहे.आतापर्यंत बेस्टच्या ताफ्यात ३८ इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या आहेत. आठ मिडी वातानुकूलित बसगाड्या ३० सप्टेंबरपर्यंत दाखल होणार आहेत. त्याचबरोबर १६० मिडी आणि १४० एकमजली मोठ्या बसगाड्या दोन महिन्यात येतील, असा अंदाज आहे. वातानुकूलित असलेल्या या बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे बसफेऱ्यावाढून प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.- बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून दररोज सरासरी ३४ लाख प्रवासी प्रवास करीत असतात.- लॉकडाऊनच्या काळातही प्रवाशांची संख्या अडीच लाख होती. तर आता पुन:श्च हरिओमनंतर प्रवासी संख्या तीन महिन्यांत १५ लाखांवर पोचली आहे.- सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी बेस्टच्या सिंगल डेकर बसगाडीमधून २५ प्रवासी बसून तर पाच जण उभ्याने प्रवास करू शकतात. तर मिनीबस गाड्यांमधून केवळ दहा प्रवासी बसून प्रवास करू शकतात. डबल डेकरमध्ये ४५ प्रवासी बसून आणि पाच प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात, असा नियम आहे.

टॅग्स :बेस्ट