Join us

पालिका कर्मचाऱ्यांचा तीनशे रुपये भत्ता अखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोना काळात रेल्वेसेवा बंद असताना, मुंबईबाहेरून येणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती, तसेच मुंबईतील पालिकेच्या कार्यालयांत पोहोचणे ...

मुंबई : कोरोना काळात रेल्वेसेवा बंद असताना, मुंबईबाहेरून येणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती, तसेच मुंबईतील पालिकेच्या कार्यालयांत पोहोचणे त्यांच्यासाठी खर्चिक पडत होते. त्यामुळे महापालिकेमार्फत प्रत्येकी कर्माचाऱ्याला तीनशे रुपये भत्ता दिला जात होता. मात्र, आता रेल्वेसेवा आणि हॉटेल सुरू झाल्यामुळे हा भत्ता बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे मुंबईतील रेल्वेसेवाही बंद करण्यात आली. मात्र, या काळात अत्यावश्यकसेवा सुरू असल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालय अथवा ड्युटी असलेल्या ठिकाणी जावे लागत होते. या दरम्यान, मुंबई बाहेरून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होऊ लागले होते.

त्यामुळे पालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना २३ मार्चपासून कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी, जेवणासाठी प्रत्येकी दैनंदिन ३०० रुपये भत्ता देण्यास सुरुवात झाली. त्याप्रमाणे, हा भत्ता गेले नऊ महिने दिला जात होता. आता मात्र, अत्यावश्यकसेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई आणि मुंबईबाहेरील प्रवाशांना बेस्ट आणि एसटी बससेवा सुरू आहे. ५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंटही सुरू झाल्याने ३१ डिसेंबरपासून हा भत्ता रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक पालिका प्रशासनाने काढले आहे.