विसर्जनासाठी तीनशे टेबल, महापौरांनी घेतला नियोजनाचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 02:04 AM2020-08-20T02:04:18+5:302020-08-20T02:04:37+5:30

मात्र गिरगाव चौपाटी सर्वात मोठी असल्याने या ठिकाणी दरवर्षी हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने येथे तीनशे टेबल लावण्यात आले आहेत.

Three hundred tables for immersion, the mayor reviewed the planning | विसर्जनासाठी तीनशे टेबल, महापौरांनी घेतला नियोजनाचा आढावा

विसर्जनासाठी तीनशे टेबल, महापौरांनी घेतला नियोजनाचा आढावा

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यावर्षी चौपाट्यांवर प्रवेशबंदी केली आहे. यासाठी चौपाट्यांवर लोखंडी मार्गरोधक लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांना आपल्या लाडक्या गणरायाला महापालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देऊन निरोप घ्यावा लागणार आहे. मात्र गिरगाव चौपाटी सर्वात मोठी असल्याने या ठिकाणी दरवर्षी हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असल्याने येथे तीनशे टेबल लावण्यात आले आहेत.
शनिवारी गणरायांचे घरोघरी आगमन होत आहे. मात्र यावर्षी कोरोनारूपी संकटाचा सामना मुंबईकर करीत असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यानुसार गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच चौपाटी, नदी, तलावांवर जाऊन गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास भाविकांना मनाई करण्यात आली आहे.
यासाठी दादर चौपाटी, माहीम चौपाटी, जुहू चौपाटी, मार्वे, गोराई जेट्टी येथे लोखंडी मार्ग रोधक लावून गणेशमूर्ती घेण्यासाठी टेबल लावण्यात आले आहेत. या सर्व व्यवस्थेची महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी पाहणी केली.
>गणेशोत्सव २०२० पुस्तिकेचे प्रकाशन
बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागाद्वारा प्रकाशित गणेशोत्सव २०२० या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन महापौरांच्या हस्ते गिरगाव चौपाटीवर करण्यात आले. ही माहिती पुस्तिका महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
>मिठाईची
दुकाने सज्ज
मुंबई : गणेशोत्सवात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला मिठाई घेण्यासाठी आवर्जून मिठाईच्या दुकानांमध्ये जात असतात. म्हणूनच मिठाईच्या दुकानांमध्ये दरवर्षी मोदक, पेढे, लाडू, जिलेबी यांसारखे विविध प्रकारचे गोड पदार्थ पाहायला मिळतात.
नैवेद्य व प्रसाद यांसाठी लागणाºया मिठाईची आॅर्डर देण्यासाठी आठवडाभर आधीच मिठाईच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांची रेलचेल असते. यंदादेखील गणेशोत्सवासाठी मिठाईची दुकाने सज्ज झाली आहेत.
मात्र कोरोनाच्या संकटामुळे यंदा मिठाईची मागणी कमी आहे. तसेच ग्राहकांची संख्यादेखील कमी आहे.
मिठाईच्या दुकानांमध्ये सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात भाविक मिठाईच्या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी येतील, अशी दुकान्े मालकांना आशा आहे.
>मालवणीत कृत्रिम तलावाला पोलिसांकडून 'हिरवा कंदील'
मुंबई : दाटीवाटीची वस्ती असलेल्या मालवणी परिसरात गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. पालिकेच्या पी उत्तर विभागाकडून यासाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला असून तलावाच्या निर्मितीला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली.
मालवणीच्या वॉर्ड नंबर ४९ मध्ये वंदे मातरम शिक्षण संस्थेच्या मैदानावर गणेश विसर्जनासाठी तात्पुरत्या स्वरूपात कृत्रिम तलाव निर्माण करावेत, अशी विनंती संस्थेचे सचिव फिरोज शेख यानी पालिकेला केली होती. ती पालिकेकडून मान्य करण्यात आली.
शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ आॅगस्ट,२०२० रोजी संजय सुतार यांच्या हस्ते कृत्रिम तलाव बनविण्याच्या कार्याचे भूमिपूजन करण्यात आले.
>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. यामुळे काही मंडळांनी गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही मंडळ दीड दिवसांचा गणपती बसवणार आहेत. लोक अजूनही बाहेरील पदार्थ खाताना विचार करत आहेत. यामुळे यंदा अनेक भाविक बाप्पाला लागणारा नैवेद्य व प्रसाद घरच्या घरीच बनवत आहेत. दरवर्षी अनेक मोठ्या मंडळांकडून येणारी मिठाईची आॅर्डर अद्यापही आलेली नाही. दरवर्षी दुकानात गणेशोत्सवासाठी नवीन मिठाईचा प्रकार उपलब्ध असतो, मात्र यंदा तो नाही. दरवर्षीच्या तुलनेत केवळ दहा टक्के व्यवसाय झाला आहे.
- रितेश जगवानी,
सतुज स्वीट्स, चेंबूर
>कोरोनाच्या काळात दुकान बंद असल्याने काही प्रमाणात व्यवसायावर परिणाम झाला. गणेशोत्सवात दरवर्षीच्या तुलनेने यंदा ग्राहकांची संख्या कमी आहे. मोदक, पेढे व लाडू यांची मागणीही घटली आहे. आम्ही सुरक्षेच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करीत आहोत. सॅनिटायझर, मास्क, फेस शील्ड, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर या सर्व गोष्टींना प्राधान्य देत आहोत. तरीदेखील आम्ही गणेशोत्सवाच्या काळापर्यंत वाट पाहत आहोत. आणि ग्राहक मिठाई घेण्यासाठी आमच्याकडे नक्की येतील अशी आम्हाला आशा आहे.
- आदित्य आचार्य, डी. दामोदर मिठाईवाला, दादर

Web Title: Three hundred tables for immersion, the mayor reviewed the planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.