मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी संवाद साधत मुंबईतील मेट्रो ३ रेल्वे प्रकल्पासह विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. केंद्र सरकारने मेट्रो ३ च्या तीन महत्त्वाच्या मंजुरी दिल्या असल्याची बाब यावेळी स्पष्ट करण्यात आली. प्रगती या फोरमच्या माध्यमातून पंतप्रधान विविध राज्यांच्या मुख्य सचिवांशी स्वतंत्रपणे संवाद साधत असतात. क्षत्रिय यांच्याशी त्यांनी आज चर्चा केली. पंतप्रधान हे क्षत्रिय यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांत मेट्रो ३ च्या केंद्राकडे असलेल्या मंजुऱ्यांना वेग आला. ब्युरो आॅफ सिव्हील एव्हिएशन, विमानतळ प्राधिकरणाची प्रलंबित मंजुरी तर मिळालीच शिवाय या प्रकल्पाच्या अंतिम आराखड्यासही केंद्राने मान्यता दिली आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५० किमीचा मेट्रो ३ प्रकल्प २२ हजार कोटी रुपये खर्चाचा आहे. क्षत्रिय यांनी या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. पंतप्रधानांनी या बाबत समाधान व्यक्त केल्याचे क्षत्रिय यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
मेट्रो ३ ला मिळाल्या तीन महत्त्वाच्या मान्यता
By admin | Published: October 01, 2015 3:15 AM