Join us

गृहनिर्मितीस वेग देणार तीन स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 2:19 AM

म्हाडाला राज्य शासनाने नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर, पुनर्वसन प्रस्तावांना चालना देण्याकरिता म्हाडा मुख्यालयात अभिन्यास मंजुरी कक्ष

मुंबई : म्हाडाला राज्य शासनाने नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर, पुनर्वसन प्रस्तावांना चालना देण्याकरिता म्हाडा मुख्यालयात अभिन्यास मंजुरी कक्ष, बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी कक्ष व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत येणारे इमारत प्रस्ताव परवानगी या कामांसाठी तीन स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने २३ मे रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार ‘म्हाडा’ला मुंबई क्षेत्रातील म्हाडाचे ११४ अभिन्यास (लेआऊट) व राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत म्हाडा स्वत: अथवा संयुक्त विद्यमाने राबवित असलेल्या व सार्वजनिक - खाजगी भागीदारी अंतर्गत म्हाडा सुकाणू अभिकरण असलेल्या प्रकल्पांसाठी नियोजन प्राधिकरणाचा दर्जा नुकताच प्रदान केला आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडा कार्यालयात हे कक्ष सुरू करण्यात आले आहेत. ज्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला अधिक वेग मिळणार आहे.या कक्षांच्या माध्यमातून देण्यात येणाºया परवानग्या आॅनलाइन पद्धतीने मिळाव्यात याकरिता मुंबई महानगरपालिकेने अंगीकृत केलेली संगणकीय आज्ञावली पालिकेच्या परवानगीने जशीच्या तशी म्हाडा कार्यालयातील या कक्षांमध्ये वापरण्यात येणार आहे. या कक्षांमधील कामकाज सुलभ व सुरळीतरीत्या पार पाडण्याकरिता मुंबई महानगरपालिकेतील अनुभवी अभियंत्यांची या कामात मदत घेण्यात येणार आहे. तसेच तीनही कक्षांत ही नवीन यंत्रणा अधिक सक्षमतेने राबविण्याकरिता म्हाडातील अभियंते व वास्तुविशारद यांना तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.येत्या १, २ व ४ जूनदरम्यान आयोजित या प्रशिक्षणात नगर नियोजन व नगर रचना क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.केंद्र सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘म्हाडा’ची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. या योजनेसाठी म्हाडामध्ये पीएमएवाय कक्ष कार्यान्वित आहे. या कक्षाच्या कार्यकक्षेचा विस्तार करून सुकाणू अभिकरण म्हणून येणारे प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रस्ताव २३ मेच्या अधिसूचनेमध्ये नमूद करून म्हाडा स्वत: अथवा संयुक्त विद्यमाने राबवित असलेल्या व सार्वजनिक व खाजगी भागीदारी अंतर्गत म्हाडा सुकाणू अभिकरण असलेल्या प्रकल्पांसाठी लागणारी इमारत परवानगी म्हाडात कार्यान्वित करण्यात आलेल्या या पीएमएवाय कक्षामार्फत दिली जाणार आहे.अभिन्यास मंजुरी कक्ष म्हाडातील वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ व रचनाकार यांच्या कार्यालयात तर मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता परवानगी कक्ष यांच्या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आला आहे.