Join us

तीन जंक्शनवरील वाहतूककोंडी फुटणार

By admin | Published: November 07, 2015 10:22 PM

नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शनवरील वाहतूककोंडीच्या समस्येला लोकमतने काहीतरी कर ठाणेकर या चळवळीच्या माध्यमातून वाचा फोडल्यानंतर झोपी गेलेल्या ठाणे महापालिका

ठाणे : नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शनवरील वाहतूककोंडीच्या समस्येला लोकमतने काहीतरी कर ठाणेकर या चळवळीच्या माध्यमातून वाचा फोडल्यानंतर झोपी गेलेल्या ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात कागदावर असलेला तीनहात नाका, नितीन आणि कॅडबरी जंक्शनचा सर्व्हे अखेर प्रत्यक्षात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, येत्या काही दिवसांत वाहतूककोंडी सोडविण्याचा पहिल्या टप्प्यातील प्रयोग तीनहात नाक्यावर केला जाणार आहे. या तीन जंक्शनच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १२ कट्स दिले जाणार असून तीनहात नाक्याचा सिग्नल ३८ सेकंदांनी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर, काही सर्व्हिस रोड वन वे केले जाणार आहेत. एकूणच यामुळे वाहतूककोंडीचा गुंता सुटून या तीन चौकांतून वाहनचालकांबरोबर पादचाऱ्यांनाही सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे.ठाणे महापालिकेने या तीन जंक्शनवरील कोंडी सोडविण्यासाठी एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून तिचा सर्व्हे केला होता. त्यानंतर, ती फोडण्यासाठी कशा पद्धतीने उपाययोजना करता येऊ शकतात, याचा अभ्यास केला असून शुक्रवारी आयुक्तांच्या दालनात त्याचे सादरीकरण केले. त्यानुसार, पहिला प्रयोग तीनहात नाका जंक्शनवर केला जाणार आहे. सध्या येथे सात सिग्नल असून २१८ सेकंदांच्या कालावधीचा सिग्नल आहे. परंतु, आता हा कालावधी १८० पर्यंत आणून तसेच काही ठिकाणचे सर्व्हिस रोड हे १०० मीटरवर आधीच बंद करून वळविण्यात येणार असून ते हाय वे ला जोडण्याचा मानस आहे. (प्रतिनिधी)१२ ठिकाणी टाकले जाणार कट्सही योजना यशस्वी होण्यासाठी तीनहात नाका ते कॅडबरी जंक्शनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १२ कट्स दिले जाणार आहेत. त्यानुसार, सर्व्हिस रोड आणि मुख्य रस्त्याच्या मध्ये हे कट्स दिले जाणार आहेत. जंक्शनच्या आधीच ते दिले जाणार असल्याने जंक्शनवर होणारी कोंडी कमी होणार आहे. जंक्शनवर येऊन टर्न मारण्याऐवजी या कट्सवर टर्न मारून वाहनचालकांना इच्छित स्थळी जाता येणार आहे. पादचाऱ्यांना या तीन चौकांतून सुरळीत चालता यावे, या उद्देशाने येथे आयलॅण्डही तयार करण्यात येणार आहेत. कोरम मॉलजवळ एक यू टर्न देण्यात येणार आहे. परंतु, एखाद्याला सर्व्हिस रोडने सरळ हाय वे ला येता येणार नसल्याचेही पालिकेने सांगितले आहे.सध्या तीनहात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शनवर दर तासाला साधारणपणे २० ते २५ हजार वाहनांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळे तीनहात नाक्याच्या सिग्नलचा वेळ कमी झाल्यास वाहनचालकांबरोबर येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांनाही जास्त वेळ ताटकळत बसण्याची गरज भासणार नसल्याचा दावाही पालिकेने केला आहे.विशेष म्हणजे या संस्थेने केलेल्या सर्व्हेत तीनहात नाक्यावर तब्बल ७२ झिगझॅग छोटेमोठे क्रॉसिंग असल्याची माहिती समोर आली आहे. ते कमी करण्यावरही भर दिला जाणार आहे.