मराठवाड्यात तीन अपघातांत १३ ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 02:57 AM2019-12-26T02:57:13+5:302019-12-26T02:57:36+5:30
वेगाचे बळी : खान्देशात २ ठार
मुंबई : मराठवाड्यात तीन आणि खान्देशात एक अशा तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये १५ जण ठार झाले. खान्देशात चौपदरीकरणाच्या कामावरील दोघा सुरक्षारक्षकांचा अज्ञात वाहनाने चिरडल्याने बळी गेला.
औरंगाबाद- जालना मार्गावर भरधाव कार अॅपे रिक्षावर आदळल्याने रिक्षातील ५ तर कारमधील १ असे ६ जण ठार झाले. जखमी चौघांवर उपचार सुरू आहेत. जालनाचे रहिवासी दिनेश जाधव कुटुंबियांसोबत रिक्षाने औरंगाबादकडे येत असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणारी कार या रिक्षावर धडकली. अपघातात दिनेश जाधव, त्यांची पत्नी रेणुका, वंदना गणेश जाधव, त्यांचा मुलगा सोहम (९) या चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर अतुल दिनेश जाधव (६ महिने) आणि कारमधील संजय बिलाला यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
मराठवाड्यातील दुसरा अपघात राष्टÑीय महामार्गावर माजलगाव (जि. बीड) जवळील गंगामसला येथे झाला. परभणी-पुणे ट्रॅव्हल बसची कारशी टक्कर होऊन कारमधील तीनजण जागीच ठार झाले. मृत परभणीचे रहिवासी आहेत. परभणीच्या शिवाजी कॉलेजचे सेवानिवृत्त उपप्राचार्य विनायक दत्तात्रय जावळे कारने पुण्यातून माजलगावमार्गे परभणीला येत होते. विरुद्ध दिशेने पुण्याकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यात जावळे व त्यांची मुलगी रुपाली जागीच ठार झाले. चालक विजय कानडेंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिसरा अपघात उस्मानाबादजवळ झाला. त्यात कंटेनरने बैलगाडीला उडविल्याने ४ जण ठार झाले.
दोन सुरक्षारक्षक ठार
खान्देशात मुक्ताईनगर (जि.जळगाव) जवळील खडसे फार्म हाऊस पुलावर वाहनाने चिरडल्याने दोन तरुण सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला. पवन संजय जयकर (१८) व ललित उर्फ छोटू आनंदा तायडे (१८, दोघेही रा. मुक्ताईनगर) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघे चुलत भाऊ असून महामार्गाच्या चौपदीकरण कामाच्या ठिकाणी गस्तीवर होते.