मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत तीन लाख 61 हजार मेट्रिक टन माल जलमार्गे मुंबई बंदरात दाखल झाला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत मुंबई बंदरात 110 हून अधिक मालवाहू जहाजांचे आगमन झाले. या जहाजांद्वारे साखर, बेस ऑइल कंटेनर, लोखंडी वस्तु व इतर सामग्रीचे मुंबई बंदरात आगमन झाले. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रवासी जहाजांच्या येण्याजाण्यावर प्रतंबिंध लादण्यात आले आहेत. मात्र देशात कोणत्याही वस्तुंची कमतरता होऊ नये यासाठी मालवाहू जहाजांच्या येण्याजाण्यावर मात्र निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. मालवाहू जहाजातील सामग्रीची वाहतूक करण्यासाठी विविध नियम लागू करण्यात आले आहेत त्यांचे पालन करुन मालवाहू जहाजातील सामग्री भरण्याचे, उतरवण्याचे काम केले जाते.
मालवाहू जहाजातील कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरात उतरण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. बंदरातील दैनंदिन प्रवासी पास देखील बंद करण्यात आले आहेत. क्रेन व छोट्या जहाजांच्या द्वारे मोठ्या मालवाहू जहाजातील सामान खाली उतरवले जाते. गेल्या तीन महिन्यात विदेशातून आलेल्या जहाजातील सुमारे 63 हजार कर्मचारी व प्रवाशांना बंदरात उतरु देण्यात आले नव्हते. 27 जानेवारी ते 30 एप्रिल दरम्यान भारतीय बंदरात सुमारे 1990 जहाजांनी नांगर टाकला त्यामधील बहुतांश जहाजे चीनमधून आलेली आहेत. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या नियमांच्या आधारे त्यापैकी कोणत्याही प्रवाशाला व कर्मचाऱ्याला बमदरात उतरु देण्यात आले नाही.