वर्षभरात तीन लाख भारतीय जलपर्यटनाकडे वळतील - जयकुमार रावल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 06:52 AM2019-05-10T06:52:43+5:302019-05-10T06:52:59+5:30
मुंबईसह देशातील जलपर्यटनाला मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत असून येत्या वर्षभरात ३ लाखांपेक्षा अधिक भारतीय जलपर्यटनाकडे वळतील, असा विश्वास राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
- खलील गिरकर
मुंबई - मुंबईसह देशातील जलपर्यटनाला मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत असून येत्या वर्षभरात ३ लाखांपेक्षा अधिक भारतीय जलपर्यटनाकडे वळतील, असा विश्वास राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
जलपर्यटनाच्या माध्यमातून मुंबईला पर्यटनाच्या नकाशावर अधिक मोठ्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. जगभरातून आलेल्या पर्यटकांना मुंबई, राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीची, ऐतिहासिक वारशाची माहिती, प्रेक्षणीय ठिकाणांची ओळख करून देण्यासाठी १५० प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई बंदर असल्याने मुंबईला देशाच्या सागरी पर्यटनामध्ये महत्त्वाचे स्थान मिळत आहे. पुढील वर्षभरात सुमारे ६०० छोटी, मोठी जहाजे मुंबई व भारतात येतील, अशी अपेक्षा आहे. किमान ३ लाखांपेक्षा जास्त भारतीय पर्यटक या माध्यमातून जलपर्यटनाकडे वळतील, असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला. मुंबईत येणाऱ्या जहाजांमधील पर्यटकांना जहाज जेवढा वेळ थांबणार असेल त्याप्रमाणे १ दिवसापासून ५ दिवसांपर्यंतचे पॅकेज तयार केली जात आहे. या पर्यटकांना मुंबईत पाऊल टाकल्यापासून
पुन्हा जहाजात बसेपर्यंत सर्व आवश्यक त्या प्रवासाच्या व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी विविध जहाज कंपन्यांसोबत पर्यटन विभागाकडून सामंजस्य करार करण्यात येत आहे.
जलपर्यटनाच्या नकाशावर निर्माण होईल मुंबईचा दबदबा
पर्यटकांना मुंबई व राज्याची ओळख करून देण्यासाठी उपलब्ध कालावधीनुसार त्यांच्यासाठी मुंबई दर्शन व राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची भेट घडवून आणली जाईल. राज्यातील १८ विविध रिसॉर्टसोबत यासाठी चर्चा करण्यात येत आहे. जहाजाद्वारे मुंबईत आलेल्या पर्यटकांना पुन्हा पुन्हा मुंबईत व राज्यात यावेसे वाटेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती रावल यांनी दिली. यासाठी केंद्रीय नौकावहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांचे सहकार्य मिळत असून जलपर्यटनाच्या नकाशावर मुंबईच्या नावाचा दबदबा निर्माण होईल, असा विश्वासही रावल यांनी व्यक्त केला.