मतदानासाठी राज्यात तीन लाख शाईच्या बाटल्या; मतदारसंघांमध्ये झाले वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 01:32 AM2019-03-26T01:32:32+5:302019-03-26T01:32:58+5:30
लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे तीन लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे तीन लाख शाईच्या बाटल्या लागणार असून त्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.
मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारा हा काळा ठिपका निवडणुकांचा अविभाज्य असा घटक आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे तीन लाख शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली होती. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंट्स कंपनी बनविते.
मतदानापूर्वी पोलिंग आॅफिसर मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करू देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.