Join us

नगरसेवकांच्या जेवणावर एका दिवसात तीन लाख खर्च, मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीपुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 4:47 AM

तीन वर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला विकास आराखडा मुदतीचे दोन दिवस शिल्लक असताना घाईघाईत मंजूर करण्यात आला. मात्र ३१ जुलै रोजी १२ तास चाललेल्या या बैठकीत नगरसेवकांच्या जेवणावळीसाठी महापालिकेने तब्बल तीन लाख रुपये खर्च केले आहेत.

मुंबई : तीन वर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला विकास आराखडा मुदतीचे दोन दिवस शिल्लक असताना घाईघाईत मंजूर करण्यात आला. मात्र ३१ जुलै रोजी १२ तास चाललेल्या या बैठकीत नगरसेवकांच्या जेवणावळीसाठी महापालिकेने तब्बल तीन लाख रुपये खर्च केले आहेत.सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले. सुधारित आराखड्यातील तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांना वेळ हवा असल्याने महासभेत तीनवेळा मुदतवाढ घेण्यात आली. अखेर तीन वर्षांच्या विलंबानंतर मुंबई शहराचा पुढील २० वर्षांचा विकास आराखडा पालिका महासभेत मंजूर झाला. ३१ जुलैला महासभेत १२ तास चर्चा झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास विकास आराखडा मंजूर करण्यात आला. यासाठी सकाळपासून महासभेत उपस्थित नगरसेवकांच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतची सोय महापालिकेने केली. नगरसेवकांच्या जेवणावर पालिकेने तीन लाख सात हजार रुपये खर्च केले आहेत. या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.यासाठी झाला खर्चनगरसेवकांचा सकाळचा नाष्टा व दुपारच्या जेवणासाठी पालिकेने साक्षी फूड्स या ठेकेदाराला एक लाख ४१ हजार रुपये मोजले आहेत. तर रात्रीच्या जेवणासाठी ठक्कर कॅटरर्स या ठेकेदाराला एक लाख ६५ हजार रुपये देण्यात आले.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका