लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमेरिकेतून मुंबईत आलेल्या मार्सेलिन कमडौम (२५) या विमान प्रवाशाकडे तीन जिवंत काडतुसे सापडली. मुख्य म्हणजे या व्यक्तीकडे शस्त्रास्त्राचा परवाना नसून तो काडतुसे घेऊन कोलकात्याला जाणार होता. याप्रकरणी सहार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
९ ऑगस्ट रोजी साडेचार वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कनिष्ठ सुरक्षा अधिकारी म्हणून काम करणारे सूरज गवाले (२४) हे प्रवाशांच्या बॅगा तपासत होते. त्याचवेळी स्क्रीनिंग मशीनने मार्सेलिन या प्रवाशाची बॅग संशयित इमेज आल्याने लेव्हल २ कडे तपासणीसाठी पाठवली. तेथील अधिकाऱ्यांनी ती पाहिल्यावर त्यात काडतुसे असावीत असा संशय त्यांना आला.
त्यानंतर ही बॅग पुन्हा लेव्हल ३ ला पाठवली गेली. पुढे लेव्हल ४ वर फिजिकल तपासणीसाठी बॅग गवाले यांच्याकडे आली. त्यांनाही बॅगेमध्ये काडतुसे असल्याचा संशय आल्याने त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत या प्रवाशाला लेव्हल ४ कडे पाठवण्यास सांगतिले. तेथे तपासणी करण्यात आली. मूळात इतकी तपासणी होत असताना त्याच्याकडे ही काडतुसे आली कशी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
स्क्रीनिंग मशीनमध्ये मार्सेलिन प्रवाशाची बॅगेची संशयित इमेज सीआयएसएफ कॉन्स्टेबल व्ही. एन. दास हे या अमेरिकन नागरिकाला घेऊन त्या ठिकाणी गेले. तेव्हा त्याच्या बॅग पडताळणीमध्ये त्यांना दोन तांब्याची काडतुसे, तर डब्ल्यूएमए १७ लिहिलेले एक तांब्याचे काडतूस सापडले. चौकशी केली असता तो ९ ऑगस्ट रोजी अमेरिकेहून मुंबईत आला आणि कोलकात्याला जाणार होता. सीआयएसएफने त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या अमेरिकन नागरिकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.