गो-फर्स्टच्या खरेदीत तीन मोठ्या कंपन्यांना रस; पुढील आठवड्यात निर्णयासाठी पहिली बैठक
By मनोज गडनीस | Published: October 9, 2023 06:37 PM2023-10-09T18:37:14+5:302023-10-09T18:37:29+5:30
विहित वेळेत या जाहिरातीला प्रतिसाद न आल्यामुळे दोन वेळा त्याला मुदत वाढ देण्यात आली होती.
मुंबई- दिवाळखोरीत गेल्यामुळे गेल्या २ मे पासून जमिनीवरच स्थिरावलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या खरेदीसाठी तीन प्रमुख विमान कंपन्यांनी रस दाखविल्याची माहिती असून यापैकी एक कंपनी परदेशी असल्याचे समजते. या संदर्भात कंपनीच्या कर्जदारांची पहिली बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. गो-फर्स्टने दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर नियमाप्रमाणे कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी कंपनीवर नियुक्त प्रशासकाने कंपनीच्या विक्रीसाठी अभिव्यक्ती स्वारस्यासाठी १० जुलै रोजी जाहीरात प्रसिद्ध केली होती. विहित वेळेत या जाहिरातीला प्रतिसाद न आल्यामुळे दोन वेळा त्याला मुदत वाढ देण्यात आली होती.
मात्र, आता लहान-मोठ्या कंपन्यांसोबत तीन प्रमुख कंपन्यांनी कंपनीच्या करेदीमध्ये रस दाखवल्यामुळे कंपनीची सेवा पुन्हा सुरू होण्याची चर्चा सुरू झाली आहे. गो-फर्स्ट ही वाडीया समुहाची कंपनी असून दिवाळखोरीनंतर जाहीर झालेल्या विक्री प्रक्रियेत वाडिया समुहाला पुन्हा एकदा ही कंपनी खरेदी करण्याची इच्छा असल्याची देखील चर्चा होती. मात्र, या तीन प्रमुख कंपन्यांत त्यांचा सहभाग नसल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी कंपनीच्या ताफ्यातील ६०० पैकी ५०० वैमानिकांनी राजीनामे दिले होते. तूर्तास कंपनीच्या ताफ्यात केवळ १०० वैमानिक व अन्य तीन हजार कर्मचारी अशी संख्या आहे. २९ ऑगस्ट रोजी ही गळती रोखण्यासाठी कंपनीने तातडीने कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार करण्याची घोषणा केली होती.