Join us

तीन कोटी रुपयांची बनावट औषधे जप्त

By admin | Published: March 12, 2016 3:56 AM

कोणतीही व्याधी, दुर्धर आजार असू द्या, त्यावर एकच उपाय’ अशी जाहिरात करून लोकांना फसवणाऱ्या मुनीर खानकडून अन्न व औषध प्रशासनाने ३ कोटी ३ लाख रुपये किमतीचा

मुंबई : ‘कोणतीही व्याधी, दुर्धर आजार असू द्या, त्यावर एकच उपाय’ अशी जाहिरात करून लोकांना फसवणाऱ्या मुनीर खानकडून अन्न व औषध प्रशासनाने ३ कोटी ३ लाख रुपये किमतीचा बनावट औषधाचा साठा जप्त केला आहे. बनावट आयुर्वेदिक औषधाची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्या मुनीरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहेत. स्वत:ला ‘सायंटिस्ट’ म्हणवून घेणाऱ्या अंधेरीच्या मुनीर खान ‘बॉडी रिव्हायव्हल’ नावाचे औषध तयार करत होता. ‘उम्मीद नवजीवन की’ या मथळ्याखाली टीव्हीवर याची जाहिरातबाजी केली जात होती. कोणताही आजार असला तरीही हे एकच औषध उपयोगी पडते. या औषधामुळे सर्व आजार दूर होतात, असे मुनीर खान याचा दावा होता. काही दिवसांपूर्वीच या औषधाची तपासणी गाझियाबादच्या शासकीय प्रयोगशाळेत करण्यात आली होती. हे औषध अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाल्यावर त्यानंतर प्रशासन आणि पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली. अंधेरी पश्चिम येथील मुनीर खानच्या जागेतून २ हजार ९९ बनावट औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. छापील किमतीप्रमाणे या मालाची किंमत ३ कोटी ३ लाख इतकी आहे. मुंबईतल्या औषध नियंत्रण प्रयोगशाळा आणि शासकीय विश्लेषकांनीही हे औषध बनावट असल्याचे सांगितले. हा अहवाल मुनीर खान यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी या औषधाचा नमुना फार्माकोपीयल लॅब फॉर इंडियन मेडिसीन, गाझियाबाद यांच्याकडे न्यायालयामार्फत पुनर्विश्लेषणासाठी पाठवण्यात आला होता. फार्माकोपीयल लॅब फॉर इंडियन मेडिसीननेही हे औषध प्रमाणित नसल्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर ८ मार्च रोजी या प्रकरणी प्रशासनाने वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी आंबोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)