तीन आमदार एकाचवेळी घेतात आमदारकीसह नगरसेवकपदाचाही भत्ता; RTI मधून माहिती उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:07 AM2021-07-27T04:07:26+5:302021-07-27T08:53:50+5:30
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सद्यस्थितीत आमदार आणि खासदार झालेले किती नगरसेवक वेतन व भत्ता अशी एकूण रक्कम घेत असल्याची माहिती मागवली होती.
मुंबई - नगरसेवक पद भूषवित असलेले अनेक इच्छुक विधानसभा व लोकसभा निवडणूकही लढवतात. यापैकी काही मोजक्या नगरसेवकांचे नशीब फळफळते; मात्र हे लोकप्रतिनिधी एकाचवेळी आमदार किंवा खासदार असताना नगरसेवक या पदावरही कायम राहू शकतात; परंतु त्यांनी एकाच पदाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित असते. आमदार बनलेले पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे हे नगरसेवक महापालिकेचे मानधन घेत असल्याची माहिती उजेडात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सद्यस्थितीत आमदार आणि खासदार झालेले किती नगरसेवक वेतन व भत्ता अशी एकूण रक्कम घेत असल्याची माहिती मागवली होती. यास पालिकेच्या चिटणीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांना दरमहा २५ हजार रुपये मानधन आणि महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता दीडशे रुपये भत्ता अशा चार सभांकरिता दिले जाते, अशी माहिती देण्यात आली आहे.