लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘कुछ देर की खामोशी है, फिर से शेर आएगा, तीन महिने की देरी है, फिर हमारा दौर आएगा’ अशा शब्दांत राज्यात तीन महिन्यात सत्ताबदल होणार असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत केला. ‘महाराष्ट्राला वाचविण्यासाठी तुम्हाला यावेच लागेल’ असे ते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.
अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करताना मुनगंटीवार म्हणाले की, बॉम्बे टू गोवा सिनेमातील एक पात्र तोंडावरील पट्टी काढताच, ‘बाबा पकोडा, बाबा पकोडा’ म्हणत असते. तसे हे सरकार काहीही झाले तरी ‘केंद्र सरकार, केंद्र सरकार’ असे जबाबदार धरत असते. नेहमी रडगाणे गात असते. आमचे पंतप्रधान असे रडगाणे कधी गात नाहीत. अजितदादा तुमच्यासारखे वित्त मंत्री असताना, ‘येस आय कॅन, येस आय विल’ अशा निर्धाराची अपेक्षा होती पण ती फोल ठरली.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर अर्थसंकल्पात निधीबाबत मोठा अन्याय झाला असल्याची आकडेवारी देत मुनगंटीवार यांनी, ‘या तीन भागांचा तोटा, लावा या सरकारला सोटा’ असे करण्याची वेळ आली असल्याचा संताप व्यक्त केला. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी मुनगंटीवार यांना रोखले तेव्हा, तुम्ही माझ्या भाषणामध्ये येऊ नका, महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका असा चिमटा त्यांनी पटोले यांना काढला.
दीड वर्षात २ लाख कोटींनी कर्ज वाढलेnराज्यावरील कर्ज गेल्या दीड वर्षात २ लाख ८ हजार कोटी रुपयांनी वाढले. कर्जाचा डोंगर वाढला. आता राज्य वाचवायचे तर तुम्हाला (फडणवीस) यावेच लागेल. काहीही ताकद लावा. अजितदादा तुम्हीही या अशी ऑफर मुनगंटीवार यांनी दिली.nघरखरेदी महिलेच्या नावे केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय सरसकट लावू नका. गरीब, मध्यमवर्गीयांना किंवा एक कोटी रुपयांपर्यंतच्या किमतीच्या घरांसाठीची ही सवलत द्या अशी सूचना त्यांनी केली.
तुम इतना क्यूं मुस्करा रहे हो पक्षात ज्येष्ठ असूनही तुम्ही मुख्यमंत्री झाला नाही, फडणवीस झाले. त्यावेळी तुम्ही मला भेटायचे तेव्हा तुमचे दु:ख मला जाणवायचे आणि जगजितसिंह यांचे, तुम इतना क्यूं मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिस को छुपा रहे हो’ हे गाणे मला आठवायचे असा चिमटा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुनगंटीवार यांना काढला.