सार्वजनिक वाहनतळ परिसरात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर तीन महिने पार्किंगबंदीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:09 AM2020-03-02T06:09:23+5:302020-03-02T06:09:27+5:30
मुंबईत विविध विकासकामे सुरू असल्यामुळे रस्त्याचा कमी भाग वाहतुकीसाठी मिळतो, वाहतूककोंडी होते.
मुंबई : मुंबईत विविध विकासकामे सुरू असल्यामुळे रस्त्याचा कमी भाग वाहतुकीसाठी मिळतो, वाहतूककोंडी होते. रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडते. अनधिकृत पार्किंगला लगाम लावण्यासाठी सार्वजनिक वाहनतळ परिसरात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर तीन महिने पार्किंगबंदी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
मुंबई महापालिकेने एफएसआयच्या बदल्यात सार्वजनिक वाहनतळाची तरतूद केली आहे. सार्वजनिक वाहनतळामुळे नागरिकांना सोईस्कर आणि सुलभरीत्या त्यांची वाहने वाहनतळात पार्क करता येतात. त्यामुळे रस्त्यावर अनधिकृत पार्किंग कमी होते, तसेच वाहतूक सुरळीत होते. महापालिकेने एफपीएन ४६, टीपीएस ३, माहिम विभाग, एनसी केळकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर पश्चिम येथील कोहिनूर सीटीएनएलमध्ये वाहनतळ सुरू झाले आहेत. ते अवजड वाहने, चारचाकी वाहनांसाठी खुले करण्यात आले आहे.
अनधिकृत पार्किंगला लगाम लावण्यासाठी सार्वजनिक वाहनतळ परिसरात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर २९ फेब्रुवारी ते ३१ मे हे तीन महिने कोणतेही खासगी किंवा सार्वजनिक वाहन पार्क करता येणार नाही, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. याचप्रमाणे अनधिकृत पार्किंगसाठी अन्य उपापयोजना केली जाणा आहे.
>नो पार्किंग असलेले रस्ते
सार्वजनिक वाहनतळाचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक वाहनतळ परिसरात पार्किंगबंदी आहे. पार्किंगबंदी असलेल्या रस्त्यांमध्ये जेके सावंत मार्ग, एनसी केळकर मार्ग, अक्षीकर पथ, वाचनालय मार्ग, रानडे रोड, डिसिल्व्हा रोड, गणेश पेठ लेन, राम मारुती रोड, डीएल वैद्य मार्ग, शिवसेना पथ, एमबी राऊत मार्ग, एनसी केळकर विस्तारित मार्ग, केळुस्कर दक्षिण मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग, बाळ गोविंददास रोड, मनोरमा नगरकर मार्ग या रस्त्यांचा समावेश आहे.