लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तंत्रशिक्षण विभागाच्या एमबीए / एमएमएस व आर्किटेक्चर पदवी तसेच उच्च शिक्षण विभागाच्या बीए/बीएस्सी, बी एड(इंटिग्रेटेड) व बीएड - एमएड (इंटिग्रेटेड) अशा एकूण चार अभ्यासक्रमांचे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात ८ डिसेंबरपासून होणार आहे. याचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
या प्रवेशप्रक्रियांसाठी नोंदणीची मुदत ८ डिसेंबर ते १३ डिसेंबरपर्यंत असणार आहे. याच दरम्यान कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश अर्जाचे कन्फर्मेशन विद्यार्थ्यांना ऑनलाइन करून घ्यायचे आहे. १३ डिसेंबरनंतर केलेल्या अर्जाचा नॉन कॅप जागांसाठी विचार करण्यात येईल, असे सीईटी सेलने जारी केलेल्या नियमावलीत म्हटले आहे. १६ डिसेंबर रोजी अभ्यासक्रमाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल आणि २० डिसेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर हाेईल. यादरम्यान १७ ते १८ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांना एखादी तक्रार, सूचना असल्यास ती कळविता येणार आहे.
पहिल्या कॅप फेरीला २१ डिसेंबरपासून ते २३ डिसेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या कॅप राउंडसाठी पसंतिक्रम भरता येणार असून त्यासाठीचे तात्पुरते प्रवेश २६ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येतील. २७ ते २९ डिसेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या जागांवर पैसे आणि कागदपत्रे देऊन प्रवेशनिश्चिती करायची आहे. दुसऱ्या कॅप राउंडसाठी उपलब्ध जागांची यादी ३० डिसेंबरला जाहीर करण्यात येईल आणि ७ जानेवारी २०२१ पर्यंत दुसरा कॅप राउंड पूर्ण करण्यात येणार आहे. १५ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना जागा आणि प्रवेशप्रक्रियेची संपूर्ण माहिती अपलोड करता येणार आहे.