मुंबई : माहुल येथील प्रकल्पबाधितांपैकी आणखी ७५ कुटुंबीयांना सोमवारी गोराई येथील घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. तत्पूर्वी येथील प्रकल्पबाधितांसाठी पहिल्या टप्प्यात म्हाडाची बोरीवली येथील २०६ घरे देण्यात आली होती.
माहुलसारख्या प्रदूषित परिसरातून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात यावे, यासाठी माहुल येथील प्रकल्पबाधितांनी आंदोलन पुकारले होते. अखेर प्रकल्पबाधितांच्या आंदोलनास यश येत आहे, अशी माहिती ‘घर बचाव, घर बनाओ’ आंदोलनातर्फे देण्यात आली. विविध प्रकल्पबाधितांना माहुल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
मात्र, माहुल येथील परिसर प्रदूषणाने वेढल्याने रहिवाशांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यावर प्रकल्पबाधितांनी आझाद मैदानासह विद्याविहार येथे आंदोलन छेडत सरकारचे लक्ष वेधले होते. कित्येक दिवसांच्या आंदोलनानंतर माहुल येथील प्रकल्पबाधितांच्या आंदोलनास यश आले आहे. इतरत्र घर मिळण्यासाठी प्रकल्पबाधितांनी न्यायालयातही धाव घेतली होती़