मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आणखी तीन वर्षे टोलवसुली; ‘एमएसआरडीसी’ने कंत्राटदारांकडून घेतली आगाऊ रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 07:27 AM2023-12-12T07:27:27+5:302023-12-12T07:28:52+5:30

बाहेरगावाहून मुंबईत यायचे झाल्यास ऐरोली, वाशी, मुलुंड, दहिसर आणि एलबीएस मार्ग येथील प्रवेशद्वारांवर टोलवसुली केली जाते.

Three more years of toll collection at Mumbai gateways; MSRDC took advance amount from contractors | मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आणखी तीन वर्षे टोलवसुली; ‘एमएसआरडीसी’ने कंत्राटदारांकडून घेतली आगाऊ रक्कम

मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आणखी तीन वर्षे टोलवसुली; ‘एमएसआरडीसी’ने कंत्राटदारांकडून घेतली आगाऊ रक्कम

मुंबई : बाहेरगावाहून मुंबईत यायचे झाल्यास ऐरोली, वाशी, मुलुंड, दहिसर आणि एलबीएस मार्ग येथील प्रवेशद्वारांवर टोलवसुली केली जाते. तसेच मुंबईहून पुण्याला जायचे झाल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर घसघशीत टोल मोजावा लागतो. या टोलवसुलीला कितीही विरोध झाला तरी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर २०२६ पर्यंत तर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर २०३० पर्यंत टोल मोजावाच लागणार आहे. कारण, या सर्व टोलनाक्यांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कंत्राटदारांकडून तब्बल १० हजार ३६२ कोटी रुपये आगाऊ घेतले आहेत.

मुंबईचे प्रवेश नाके, अंधेरी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, ठाणे खाडी पूल-२ यांसाठी एमएसआरडीसीला १,२५९ कोटी रुपये खर्च आला होता. यासाठी ऐरोली, वाशी, मुलुंड, दहिसर व एलबीएस रोड या ठिकाणी असलेल्या पथकर नाक्यांवरून आतापर्यंत ३,१७२ कोटी रुपये इतक्या रकमेचा टोल वसूल झाला आहे. मात्र, एमएसआरडीसीने टोलवसुली कंत्राटदाराकडून २,१०० कोटी रुपये आगाऊ घेतल्याने या मार्गांवरील टोलवसुलीचा काळ लांबला आहे. आता नोव्हेंबर, २०२६पर्य़ंत ही वसुली सुरू राहील.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाबाबतही हेच कारण आहे. या मार्गासाठी २,५८५ कोटी खर्च आला होता. मात्र, त्यावर एमएसआरडीसीने ९,९२९ कोटी इतकी रक्कम आगाऊच कंत्राटदाराकडून घेतल्याने हा द्रुतगती मार्ग एप्रिल, २०३० पर्यंत टोलमुक्त होण्याची शक्यता नाही. या खर्चात देखभाल, दुरुस्तीकरिता येणाऱ्या खर्चाचा समावेश नाही. प्रकल्पांसाठी घेण्यात आलेल्या कर्जावरील व्याजाच्या रकमेचा समावेश नाही.

३२८ कोटींची समृद्धीवर वसुली

नव्याने झालेल्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी ५७,९१३ कोटी खर्च करण्यात आला. त्यापैकी केवळ ३२८ कोटी रुपयांची टोलवसुली आतापर्य़ंत झाली आहे.

१,२२८ कोटी रुपये सी लिंकवर...

वांद्रे-वरळी सी लिंक अशी ओळख असलेल्या राजीव गांधी सागरी सेतूकरिता १,९७५ कोटी इतका खर्च आला होता. या मार्गावर १,२२८ कोटी इतकी टोलवसुली झाली आहे.

१३ मार्गांवर बंद

 एमएसआरडीसीकडून राज्यभर सध्या नऊ मार्गांवर टोलवसुली केली जाते.
 १३ मार्गांवरील टोलवसुली प्रकल्पाचा खर्च निघाल्याने बंद करण्यात आली आहे.

  तीन कामे प्रगतिपथावर  

 एमएसआरडीसीची तीन कामे प्रगतिपथावर आहेत. त्यापैकी एक वर्साेवा - वांद्रे सागरी सेतू हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी १,९२० कोटी इतका खर्च येणार आहे. टोलच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाल्याने एमएसआरडीसीला सर्वसामान्यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागले होते.

 राजकीय पक्षांनी टोलनाक्यांवर आंदोलने केल्यानंतर टोलवसुलीसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार हा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.

Web Title: Three more years of toll collection at Mumbai gateways; MSRDC took advance amount from contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.