मुंबई : एका खुराडेवजा खोलीत तीन ते चार जणांचा मुक्काम, त्यांच्या सामान, अभ्यासाची जाडजूड पुस्तके, झोपायला खाट नाही, खेळत्या हवेचा अभाव, अशी स्थिती असते वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची. महापालिका रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशाच परिस्थितीत राहावे लागते. पण थोड्याच दिवसांत हे चित्र पालटणार आहे. महापालिकेच्या नायर, केईएम, सायन या तीन प्रमुख रुग्णालयांतील विद्यार्थ्यांसाठी तीन नवीन वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. नायरसाठी हाजी अली येथे, केईएमसाठी वडाळ्याच्या अॅक्वर्थ कॅम्पसमध्ये आणि सायनसाठी सायन कोळीवाड्याच्या कॅम्पसमध्ये वसतिगृह उभारण्यात येणार आहे. नायरच्या वसतिगृहात ६०० ते ७०० विद्यार्थी राहू शकणार आहेत. तर केईएम आणि सायनच्या वसतिगृहात १ हजार विद्यार्थ्यांना राहता येणार आहे. सध्या नायरच्या वसतिगृहात ७०० ते ८०० विद्यार्थी, केईएमच्या वसतिगृहात हजार तर सायनच्या वसतिगृहात ८०० विद्यार्थी राहत आहेत. नवीन बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाचा प्लॅन तयार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजांचा विचार करून खोल्या बांधण्यात येणार आहेत. यामध्ये काही खोल्यांमध्येच स्वच्छतागृह असणार आहेत. या वसतिगृहात इंटरनेटची सुविधा त्यांना देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या दिनक्रमामुळे ते खूप थकून जातात. त्यांना विरंगुळा असावा म्हणून जिमखाना असणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तके, वस्तू ठेवण्यास या खोल्यांमध्ये स्वतंत्र जागा असणार आहे. खोल्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी या खोल्यांची रचना विशिष्ट पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सकाळी बाह्यरुग्ण विभागात काम करतात. दुपारी लेक्चर देऊन संध्याकाळी वॉर्डमध्ये त्यांना राउंड मारावी लागते. याचबरोबर अभ्यासही करायचा असतो. विद्यार्थ्यांना अशाच परिस्थितीत राहावे लागत असल्यामुळे त्यांना टीबीसारखे आजार जडतात. राहायला चांगली, हवेशीर खोली द्यावी अशी मागणी गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टर्सतर्फे (मार्ड) करण्यात येत आहे. पुढच्या काहीच दिवसांत त्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे. (प्रतिनिधी)च्गेल्या काही वर्षांपासून वसतिगृहाच्या खोल्यांमध्ये हवा खेळती राहावी. एका खोलीत दोनच विद्यार्थी असावेत, अशा मागण्या होत्या. परंतु, त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. आता नवीन वसतिगृह बांधण्यात येणार आहेत, यामुळे आमची मागणी पूर्ण होईल याचा आनंद आहे, असे मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी तीन नवीन वसतिगृहे
By admin | Published: April 12, 2015 12:17 AM